Rahul Gandhi vacates Government Bungalow : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना सगळे मोदी चोर कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला होता. या वक्तव्याप्रकरणी सुरत न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आज त्यांचा सरकारी बंगला सोडावा लागला. बंगला सोडताना राहुल गांधी म्हणाले की, खरं बोलण्याची किंमत मोजावीच लागेल, आणि मी ती मोजत राहीन.
दरम्यान, हा बंगला सोडल्यानंतर काँग्रेसने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, राहुल त्यांचं घर रिकामं करत आहेत. तसेच त्यांनी घराला कुलूप लावून घराची चावी संबंधित अधिकाऱ्याकडे सोपवली. तसेच या व्हिडीओमध्ये राहुल गांधींच्या एका जुन्या भाषणाचा काही भाग ऐकायला मिळत आहे.
यामध्ये राहुल गांधी म्हणत आहेत की, ५२ वर्ष झाली माझ्याकडे घर नाही. अजूनही माझ्याकडे स्वतःचं घर नाही. आमच्या कुटुंबियांचं जे घर आहे ते अलाहाबादमध्ये आहे, पण तेही आमच्या मालकीचं घर नाही. मी आईला विचारलं आई, आता कुठे जायचं? आई म्हणाली माहीत नाही. माहीत नाही कुठे जायचं आहे. हे ऐकून मला आश्यर्य वाटलं. कारण मला वाटायचं ते आमचं घर होतं. परंतु ते आमचं घर नव्हतं.
हे ही वाचा >> “तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…
बंगला सोडल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी त्यांचं १९ वर्ष वास्तव्य असलेला बंगला रिकामा करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी ते म्हणाले की, हे घर त्यांना देशातील जनतेने दिलं होतं. या घरात ते १९ वर्षांपासून राहत होते. परंतु केंद्र सरकारने त्यांच्याकडून हा बंगला हिसकावून घेतला आहे. तरीदेखील मी सरकारविरोधात खरं बोलणं सुरूच ठेवणार आहे.