राहुल गांधी यांच्या एका व्हिडीओमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे. हा व्हिडीओ एका पार्टीमधला असून त्यावरून भाजपानं राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “मुंबईला वेठीस धरलं जात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात अनेक स्फोट होत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये आहेत”, अशा शब्दांत भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केल्यानंतर आता काँग्रेसकडून त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडली आहे. यावेळी सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचा देखील दाखला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

अमित मालवीय यांनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी त्यांच्या एखा मैत्रीणीसोबत दिसत आहेत. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ एका नाईटक्लबमधील असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता. यावरूनच भाजपाकडून राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला. मात्र, त्यानंतर काँग्रेसकडून करण्यात आळेल्या खुलाशानुसार हा व्हिडीओ राहुल गांधींच्या एका मैत्रीणीच्या लग्न समारंभातला आहे!

काँग्रेसचं स्पष्टीकरण

रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा केला आहे. “राहुल गांधी नेपाळला गेले होते. ते भारताचं मित्रराष्ट्र आहे. तिथे त्यांच्या एका पत्रकार मैत्रिणीच्या लग्नासाठी ते गेले होते. यात काहीही चुकीचं नाहीये. हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. हा काही गुन्हा नाही. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा लवकरच मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या लग्नाला हजेरी लावणं हा देखील गुन्हा ठरवतील”, असं सुरजेवाला म्हणाले आहेत.

राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल; भाजपाने साधला निशाणा; म्हणाले “नियमित पार्ट्या, सुट्ट्या, खासगी विदेश दौरे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावरून देखील निशाणा साधला. “राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे पाकिस्तानला नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी बिन बुलाए मेहमानसारखे गेले नव्हते. आणि त्यानंतर पठाणकोटला काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे”, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi viral video kathmandu party congress slams bjp pm narendra modi pmw