काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (९ सप्टेंबर) ते पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना वैष्णोदेवीला यायचं होतं. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे ते हा दौरा करु शकत नव्हते असं काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, आता आपल्या या २ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी काश्मिरी पंडित आहे. माझं कुटुंब काश्मिरी पंडित आहे. म्हणूनच मी जेव्हा जम्मू -काश्मीरला येतो तेव्हा मला असं वाटतं की मी घरीच आलो आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

जम्मू-काश्मीरबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मी काश्मिरी पंडित आहे. माझं कुटुंब काश्मिरी पंडित आहे. माझ्या कुटुंबाचं जम्मू -काश्मीरशी असलेलं नातं खूप जुनं आहे. म्हणूनच, मी जेव्हा जम्मू -काश्मीरला येतो तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या घरीच आलो आहे. इथल्या लोकांच्या समस्या मला माझ्याच समस्या आहेत असं वाटतं. म्हणूनच जम्मू -काश्मीरला आपला हक्क मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष केंद्राविरोधात आपलं आंदोलन सुरूच ठेवेल. जम्मू -काश्मीरला त्याचं राज्यत्व परत मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही”, असं इशारा देखील राहुल गांधी यांनी यावेळी दिला आहे. आपला २ दिवसांचा दौरा संपवून दिल्लीला जाण्यापूर्वी राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते.

माझ्या काश्मिरी पंडित बांधवांना मी वचन देतो की…!

“आज सकाळी काश्मिरी पंडितांचं शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की काँग्रेसने त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. पण भाजपाने काहीच केलं नाही. पण मी माझ्या काश्मिरी पंडित बांधवांना वचन देतो की, मी त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करेन”, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. ते म्हणाले, “माझ्या हृदयात जम्मू -काश्मीरला विशेष स्थान आहे. पण मला वेदनाही होतात. जम्मू -काश्मीरमध्ये बंधुभाव आहे. पण भाजप आणि आरएसएस ते बंधन तोडण्याचं प्रयत्न करत आहेत”, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.

लवकरच लडाखला जाण्याचा विचार

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले की, “जम्मू-काश्मीरनंतर आता लवकरच मी लडाखला जाण्याचा विचार करत आहे. लवकरच मी लडाखच्या लोकांमध्ये जाईन आणि त्यांना भेटेन.” यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, “आज देशातील जनता त्रस्त आहे. महागाई गगनाला भिडत असताना दिसत आहे. परिस्थिती बिकट आहे. देशातील गरीब माणसाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण होत आहे.”

भाजपाने जम्मू -काश्मीरला कमकुवत केलं!

भाजपवर शाब्दिक हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपाने जम्मू -काश्मीरला कमकुवत केलं आहे. तुमचं राज्यत्व तुमच्याकडून हिसकावून घेतलं आहे. पण जम्मू -काश्मीरला त्याचं राज्यत्व परत मिळायलाचं हवं.”

Story img Loader