Rahul Gandhi Launch Congress Campaign In Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दोन सभा जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांद्वारे काँग्रेस विधानसभा निडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या दोन सभा
काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची पहिली सभा रामबन आणि दुसरी सभा अनंतनाग जिल्ह्यात होणार आहे. या दोन्ही जागांवर पहिल्या टप्प्यात म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह ४० स्टार प्रचारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले…
राहुल गांधी हे उद्यापासून जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करतील, ते बुधवारी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ रामबन आणि अनंतनाग जिल्ह्यात सभा घेणार आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी दिली आहे. रामबन जिल्ह्यातील बनिहाल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष विकार रसूल वानी तर अनंतनाग जिल्ह्यातील डोरू विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मंत्री गुलाम अहमद मीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तीन टप्प्यात मतदान पार पडणार मतदान
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर १० वर्षांनी विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्याचं मतदान २५ सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात युती
महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. त्यानुसार, नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागा तर काँग्रेस ३२ जागा लढवणार आहेत. पाच जागांवर दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत. तर सीपीआय(एम) आणि पँथर्स पक्षासाठी प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे.