जर काँग्रेसने पुन्हा निवडणुका जिंकल्या तर पंतप्रधान मनमोहन सिंग हे पुन्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. आपल्याकडे अध्यक्षीय पद्धत नाही. काँग्रेस पंतप्रधानपद किंवा मुख्यमंत्री पद यासाठी कधी उमेदवार घोषित करीत नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्यावेळी आम्ही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.
काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी शुक्रवारी सांगितले.
नरेंद्र मोदी यांना प्रचार प्रमुख पद दिले असून त्यांना भावी पंतप्रधान म्हणून अप्रत्यक्षपणे पुढे आणले जात आहे, त्यामुळे मोदी यांचे आव्हान राहुल यांना असल्याबाबतची मते फेटाळताना दिग्विजय सिंग यांनी हे स्पष्टीकरण केले.
दिग्विजय सिंग म्हणाले की, जर काँग्रेसने पुन्हा निवडणुका जिंकल्या तर पंतप्रधान मनमोहन सिंग हे पुन्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. आपल्याकडे अध्यक्षीय पद्धत नाही. काँग्रेस पंतप्रधानपद किंवा मुख्यमंत्रीपद यासाठी कधी उमेदवार घोषित करीत नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्यावेळी आम्ही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.
काँग्रेसला राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आत्मविश्वास का वाटत नाही, असे विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
पुढील लोकसभा निवडणुकीनंतर डाव्या आघाडीशी वाटाघाटी करण्यास आमचा विरोध नाही, मोदी यांच्यामुळे कदाचित निवडणुकीनंतर अशा प्रकारचे कुठलेही ध्रुवीकरण होऊ शकते असे त्यांनी सांगितले.
भाजपने नरेंद्र मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख जाहीर करून अप्रत्यक्षपणे ते पंतप्रधानपदाचे उमेदवारच असल्याचे चित्र निर्माण केले आहे, त्यावर विचारले असता दिग्विजय सिंग यांनी सांगितले की, आम्हाला त्याची चिंता वाटत नाही. भाजप काहीही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. आम्ही विचारसरणीचे राजकारण करतो. व्यक्तिनिष्ठ राजकारण करीत नाही. ध्रुवीकरणाच्या राजकारणावर काँग्रेसचा विश्वास नाही.
मोदी यांनी काँग्रेसला वैचारिक व व्यवस्थापकीय आव्हान निर्माण केले आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केले आहे त्यावर विचारले असता दिग्विजय सिंग म्हणाले की, मोदी व लालकृष्ण अडवाणी ही नावेच ध्रुवीकरणाचे प्रतीक आहेत. मोदी हे आव्हान नाही तर संघाची विचारसरणी, तोडफोडीचे राजकारण व द्वेषाचे, हिंसेचे राजकारण हे खरे आव्हान आहे.पंतप्रधान मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधान होतील काय या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले. ते म्हणाले की, पहिल्यांदा देशाने जनमताचा कौल दिला पाहिजे, नंतर संसदीय पक्ष, पक्षाचे प्रमुख निर्वाचित खासदारांशी सल्लामसलतीने निर्णय घेतील.
डावे पक्ष हा काँग्रेसचा स्वाभाविक मित्र पक्ष आहे काय, असे विचारले असता ते म्हणाले की, युपीए १ च्या काळात जी चार वर्षे त्यांनी पाठिंबा दिला तो चांगला अनुभव होता पण दुर्दैवाने नंतर त्यांनी अणुविधेयकाचा मुद्दा लावून सरकारचा पाठिंबा काढला. डाव्यांच्या बाबतीत कुठल्या मुद्दय़ांवर एकत्र काम करता येईल हे आम्हाला आधीच माहिती आहे.
जनता दल संयुक्त बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडल्याने तो युपीएचा घटक पक्ष होईल किंवा कसे, याबाबत विचारले असता ते म्हणाले की,यावर काँग्रेस श्रेष्ठीच विचार करू शकतील.गोध्रात रेल्वे दुर्घटनेवेळी नितीशकुमार यांनी राजीनामा दिला नाही पण रामविलास पास्वान यांनी मात्र राजीनामा दिला. आता नितीशकुमार यांनी सकारात्मक पाऊल उचललेले आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी बिहार निवडणुकीत हे धैर्य दाखवले असते तर भाजपला इतक्या जागा मिळाल्या नसत्या.
यूपीए-२ ने आर्थिक पेचप्रसंगाच्या काळातही शाश्वत विकास टिकवून ठेवला. यूपीएने ग्रामीण भागातील अनेक विकास योजनात पैसा ओतला असे ते म्हणाले. यूपीए २ ची प्रतिमा खराब झाल्याचा दावा फेटाळताना त्यांनी सांगितले की, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, कर्नाटक ही राज्ये आम्ही भाजपकडून हिसकावली आहेत. जर प्रतिमा खराब होती तर मग काँग्रेसची मते २००९ नंतर गोवा व बिहार वगळता सर्व राज्यांत वाढली आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा अधिक मिळाल्या आहेत, भाजपने तीन राज्येच गमावली असे नाही तर गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ९० जागाही गमावल्या आहेत.