काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी हिंदू धर्माचा उल्लेख करत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या काही मंत्र्यांनीही आक्षेपही घेतला होता. यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं असताना आता त्यांच्या भाषणातील काही भाग वगळण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे.

हेही वाचा – ‘वरून’ खटाखट आदेश आले असतील! लोकसभेत राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच अशा प्रकारे भाषणातील भाग वगळणं हे लोकशाही तत्त्वाच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले. ज्याप्रकारे लोकसभेच्या रेकॉर्डवरून माझ्या भाषणातील काही भाग वगळण्यात आला आहे, ते बघून आश्चर्य वाटतं आहे. अशाप्रकारे माझ्या भाषणातील काही भाग काढून टाकणं हे लोकशाही तत्त्वाच्या विरोधात आहे, असं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच जो भाग वगळण्यात आला आहे, तो भाग पुन्हा जोडण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे पत्र लिहिण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनाही लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी यांच्या दुनियेत सत्य लपवले जाऊ शकते. पण वास्तविक परिस्थितीत सत्य लपवलं जाऊ शकत नाही. जे सत्य असतं ते सत्यंच राहतं. मला जे बोलायचं होतं, ते मी लोकसभेत बोललो आणि तेच सत्य आहे, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – “राहुल गांधींनी भाजपाच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा काढला”, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

दरम्यान, सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. मागच्या दहा वर्षांत लोकांना घाबरवणं, तुरुंगात टाकणं हे प्रकार सर्रास सुरु होते. जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात ठरवून कारवाया झाल्या. मीडियाचा वापर करुन मलाही नावं ठेवण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाले होते. तसेच आमची उर्जा भगवान शंकर आहेत असं राहुल गांधींनी म्हटलं होते. त्यानंतर स्पीकर ओम बिर्ला यांनी यावर आक्षेप घेत कुठलंही चित्र तुम्ही लोकसभेत दाखवू शकत नाही असं ते राहुल गांधींना म्हणाले होते. ज्यानंतर आम्हाला भगवान शंकराकडून कशी प्रेरणा मिळाली हे राहुल गांधींनी भाषणात सांगितलं होतं.