सुषमा स्वराज यांच्या कुटुंबीयांच्या बॅंक खात्यामध्ये ललित मोदींकडून किती पैसे जमा झाले, याची माहिती त्यांनी संसदेला द्यावी, आम्ही लगेचच आमचे आंदोलन मागे घेऊ, असे सांगत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधला. सुषमा स्वराज यांचे कुटुंबीय आणि ललित मोदी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ललित मोदी प्रकरणावरून लोकसभेमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ललित मोदी आणि सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. विरोधक सभागृहात नसताना सुषमा स्वराज यांनी या प्रकरणी केलेल्या निवेदनावरही त्यांनी आक्षेप घेतला. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे दोनवेळा तहकूब करण्यात आले.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केले होते. त्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. सोमवारी कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांचे सदस्य कामकाजात सहभागी झाले होते. प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, सुषमा स्वराज यांनी मानवतेच्या दृष्टिने ललित मोदी यांच्या पत्नीला मदत केल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि ललित मोदी यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी ललित मोदी यांना मदत केली आहे. विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात नसताना या विषयावर सभागृहात निवेदन देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
त्यानंतर संसदभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांच्यावर टीका केली. गेल्या आठवड्यातही राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांना आर्थिक लाभ झाल्याचा आरोप केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा