Kerala Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे, जीव ढिगार्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधून देणार आहे.
यावेळी राहुल गांधींनी सांगितलं की, “मी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा केला. ही एक भयंकर दुर्घटना आहे. आम्ही काल घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे. यावेळी प्रशासनाकडून आम्हाला या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि नुकसान झालेल्या घरांची संख्यांबाबत माहिती दिली. यावेळी आम्ही सांगितलं की, पक्षाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच १०० पेक्षा जास्त घरे बांधण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे”, असं राहुल गांधींनी सांगितलं.
Kerala has never witnessed a tragedy in one area as devastating as the one in Wayanad this time. I will raise this issue with both the Union and State Governments, as this tragedy demands a unique and urgent response.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 2, 2024
Our immediate focus is on rescue, relief, and rehabilitation… pic.twitter.com/cdF3J5OgYE
“मला असं वाटतं की, केरळने अशी घटना याआधी कधीही पाहिली नाही किंवा मला वाटतं केरळ सारखी अशी घटना एकाही प्रदेशात पाहिली नाही. या दुर्घटनेसंदर्भात मी केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. तसेच दिल्लीतही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे”, असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
राहुल गांधींकडून भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी
वायनाड येथे भूस्खलन होऊन तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. तर काही लोक अद्यापही बेपत्ता आहेत. खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी वायनाड येथील दुर्घटनाग्रस्त भागाचा काल दौरा केला. तसेच तेथील बाधित लोकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी काहीसे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटलं, “माझ्या वडिलांचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता, त्यावेळी मला जे दुःख झालं होतं, तेच दुःख आज होत आहे. मी तर वडील गमावले होते. पण वायनाडमध्ये काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. कुणाचा भाऊ, वडील, आई दगावली आहे.”
दरम्यान, राहुल गांधी हे २०१९ आणि २०२४ साली वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४ साली त्यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यामुळे वायनाडचा राजीनामा देऊन याठिकाणी प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने केली होती. त्यामुळे या दौऱ्यात राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधीही दिसून आल्या.