पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणेवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी जोरदार टीका केली. भाजपचे मंत्री आणि अन्य नेत्यांविरुद्ध लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी येत असल्याने आता ‘बेटी पढाओ, भाजपके मंत्री, नेता, आमदारोंसे बचाओ’ असे या घोषणेचे नामकरण केले पाहिजे, असे गांधी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले त्या संदर्भाने गांधी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला.
मध्य प्रदेशातील शेवपूर जिल्ह्य़ात एका जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोदी यांनी उत्तम घोषणा केली आहे; परंतु मोदी यांच्या मंत्र्यांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा आमदार बलात्कार करतो, मात्र मोदी एक शब्दही त्याबद्दल बोलत नाहीत, असे गांधी म्हणाले.
केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आणि भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार कुलदीपसिंह सेनगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. त्यावर केवळ मोदीच नाहीत तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही. अकबर यांच्याविरुद्ध १२ हून अधिक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यामुळे काँग्रेसने अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर कुलदीपसिंह सेनेगर हे उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आहेत. सीबीआयने आरोपपत्रामध्ये त्यांचे नाव नमूद केले आहे.