New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates : दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळाही अवघ्या देशातील जनतेने पाहिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आलं नाही, असा दावा विरोधकांनी केला होता. यावरून देशभरातील २० पक्षांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे, असं म्हणत विरोधकांनी संयुक्त निवेदन जारी करून बहिष्कार जाहीर केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. तर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील उद्घाटन होताच ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

“संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तसंच, अनेकांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावाही विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे. त्यामुळे यावरून देशातील राजकारण तापले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी नेहरूंच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याची भूमिका मांडली. “आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis first reaction as soon as the new parliament building was inaugurated said coronation sgk