उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूक लक्षात घेवून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी अमेठीमध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते. प्रभागातील लोकांशी त्यांनी चर्चा केली. राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान लोकांनी राहुल गांधी यांना राज्यातील दुसऱ्या भागातदेखील जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या आधी प्रियांका गांधींना सक्रिय राजकारणात आणण्याची मागणीसुद्धा केली. तसेच निवडणुकीतील उमेदवारांची लवकरात लवकर घोषणा करण्यास सांगितले.
राहुल गांधी यांचा जनता दरबार जवळजवळ तीन तास चालला. यादरम्यान अस्थायी स्वरुपात उभारण्यात आलेला एक तंबू कोसळून काही कार्यकर्त्यांना इजा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नंतर घोरहा येथे सरपंच बिंदू सिंग यांच्या घरी त्यांनी छोटेखानी सभा बोलावली. या ठिकाणी जमलेल्या लोकांनी प्रियांका गांधींना सक्रिय राजकारणात आणण्याची मागणी राहुल गांधींकडे केल्याचे सूत्रांकडून समजते. उपस्थित ग्रामस्थांनी राहुल गांधींना चणे, गुळ आणि चटणी खाऊ घातली. यावर सभेला उपस्थित एक ग्रामस्थ गंमतीने म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘चाय पे चर्चा’ तर उत्तरादाखल राहुल गांधींची ‘चने पर चर्चा’.

Story img Loader