काँग्रेस खासदार राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाल्यापासून बरेच सक्रिय झाले आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यापासून देशात नीट पेपरफुटीचं प्रकरण गाजतंय. हे प्रकरण थेट संसदेतही पोहोचलं आहे. याविषयी संसदेत प्रश्न मांडताना राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय. यासंदर्भातील व्हीडिओच त्यांनी एक्स खात्यावरून शेअर केला आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींनी मायक्रोफोन वापरण्याची परावनगी मागितली. त्यावर खासदारांचे मायक्रोफोन बंद केले जात नाहीत आणि त्यांच्याकडे असे कोणतेही नियंत्रण नाही, असं ओम बिर्ला म्हणाले. “चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व्हायला हवी. इतर बाबी सभागृहात नोंदवल्या जाणार नाहीत,” असंही बिर्ला यांनी पुढे स्पष्ट केलं.

“एकीकडे नरेंद्र मोदी नीटवर काहीही बोलत नसताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात तरुणांचा आवाज उठवत आहेत. मात्र, एवढ्या गंभीर मुद्द्यावरून तरुणांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माईक बंद करण्यासारखी कृत्ये केली जात आहेत”, असं काँग्रेसने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.

पदवीपूर्व वैद्यकीय कार्यक्रमांसाठी NEET-UG 2024 परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या दावा केला जात आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. कामकाज सुरू होताच काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी पेपरफुटीच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर केला. परंतु, अध्यक्षांनी संसदेला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सभागृह चर्चा करेल असे सांगितले.

लोकसभेत गदारोळ सुरू होताच सभापतींनी सभागृहाचे कामकाज १ जुलैपर्यंत तहकूब केले. सरकारी सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावादरम्यान स्थगन प्रस्ताव आणण्याची परंपरा नव्हती. “विरोधक अनावश्यक मागणी करत आहेत. सरकार NEET च्या मुद्द्यावर बोलण्यास तयार आहे”, असंही एका सूत्राने सांगितले असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

हेही वाचा>> Parliament Session 2024 LIVE Updates : “आजचा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासावरील काळा डाग बनलाय”, सभापती असं का म्हणाले?

राहुल गांधींनी शेअर केला व्हीडिओ

“NEET परीक्षेत पेपर लीक झाला आमि लोकांनी हजारो- कोट्यवधी रुपये कमावले. त्या सर्व विद्यार्थ्यांची स्वप्ने आणि आकांक्षा उद्ध्वस्त करून थट्टा सुरू आहे. त्यामुळे काल विरोधी पक्षाच्या बैठकीत मी विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांची काळजी आहे, आमच्या विद्यार्थ्यांवर आमचा विश्वास आहे, जे आमच्या देशाचे भविष्य आहेत यावर चर्चा करण्यासाठी एक दिवस घालवला पाहिजे”, असं राहुल गांधी म्हणाले.

सर्व विरोधी पक्षांनी एकमताने निर्णय घेतला की आपण शांततेत चर्चा केली पाहिजे. जेव्हा मी संसदेत हा मुद्दा मांडला तेव्हा मला बोलू दिले गेले नाही, त्यामुळे ७ वर्षांत ७० वेळा २ कोटी विद्यार्थी प्रभावित झाले. हे स्पष्ट आहे की एक पद्धतशीर समस्या आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि आपण ते चालू ठेवू शकत नाही. आपण या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. चर्चेचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांना केवळ चर्चा नको असते, हे दुर्दैव आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत आणि आम्हाला सरकारशी लढायचे नाही आणि आमचे मत सभागृहात ठेवायचे आहे, असं राहुल गांधी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.