केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी येथून बुधवार ( ७ सप्टेंबर ) या पदयात्रेचा आरंभ झाला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेसचे नेतेदेखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत.
भाजपाकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले की, “काँग्रेस देशाला जोडण्यात गुंतलेली आहे. तर सत्ताधारी(भाजपा) अजूनही टी-शर्ट आणि खाकी चड्डीतच अडकलेले आहेत.”
“कीव करावीशी वाटत आहे. कन्याकुमारी ते काश्मीर, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारत जोडो यात्रेला उत्तर, केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे ‘टी-शर्ट’ आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जेव्हा एक पक्ष देशाला एकत्र आणत आहे, तेव्हा फूट पाडणारा पक्ष अजूनही टी-शर्ट आणि खाकी चड्डीत लटकलेला आहे. भीती चांगली वाटली.” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज तिसर्या दिवस असताना राहुल गांधींच्या टी-शर्टवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे.
“मोदींचा १० लाख रुपयांचा सूट…” –
याशिवाय भाजपाने राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या ट्विटला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटबद्दल चर्चा करायची का? असं आव्हानदेखील दिलं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “भारत जोडो यात्रेला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून घाबरला काय. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर चर्चा करा. बाकी कपड्यांवर चर्चा करायची झाली, तर मोदींचा १० लाख रुपयांचा सुट आणि १.५ लाख रुपयांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल,” असं उत्तर काँग्रेसने दिलं आहे.
“राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही, भारत जोडो यात्रेमुळे…” – नाना पटोलेंचे प्रत्युत्तर
राहुल गांधी नेहमी कुर्ता आणि पायजम्यामध्ये सर्वांना दिसतात. पण, भारत जोडो यात्रेच्या प्रवासावेळी त्यांनी टी-शर्ट आणि पँट घातली आहे. त्यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किंमतीवरून भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपाने याबाबत ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी कंपनीच्या ब्रँडचा बर्बेरी हा पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये असल्याचं सांगितलं आहे. तसेच, ‘भारत देखो’ असे कॅप्शनही त्यावर लिहलं आहे. या ट्विटमुळे राहुल गांधी यांच्या परिधान केलेल्या कपड्यांच्या किंमतींची चर्चा होत आहेत.