काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाराणसी मतदारसंघातील ‘रोड शो’ ला शनिवारी सकाळी सुरूवात झाली. यापूर्वी भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या गेल्या दोन दिवसांत वाराणसीत प्रचारफेरी काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या ‘रोड शो’कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी वाराणसीत प्रचार करणार आहेत. सकाळी गोल गड्डा भागातून राहुल यांनी ‘रोड शो’ला सुरवात केली. मोकळ्या जीपमधून निघालेल्या ‘रोड शो’मध्ये त्यांच्याबरोबर अजय राय, गुलामनबी आझाद, मुकुल वासनिक आणि रशीद अल्वी हेही उपस्थित होते.
रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती, तर काँग्रेसचे झेंडे फडकत होते. येत्या १२ मे रोजी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वाराणसीत मतदान होणार आहे. देशात शेवटच्या टप्प्यात होणारा मतदानासाठी आज प्रचाराचा अंतिम दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भाजपचे नरेंद्र मोदी हेसुद्धा आज उत्तरप्रदेशात पाच सभा घेणार आहेत.

१०.४९:  
दरम्यान वाराणसीत प्रचारसभा काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नरेंद्र मोदींना काही दिवसांपूर्वी परवानगी नाकारली होती, मग राहुल गांधींना वेगळा न्याय का ? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना परवानगी नाकारताना सुरक्षेचे कारण पुढे केले होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे सुरक्षेची नाही तर राजकीय कारणे असल्याचा आरोप भाजप नेते अरूण जेटली यांनी केला.

 ११.५०:
राहुल गांधी यांच्या रोड शो ला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह उपस्थित आहेत. कृपाशंकर सिंह यांच्यावर २०१२ साली बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे आरोप करण्यात आले होते.  मुंबई उच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी २०१२ रोजी पोलीस आयुक्तांना सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कारवाई करण्याबाबत सांगितल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.  सध्या याप्रकरणी कृपाशंकर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे नेत्यांच्या स्वच्छ प्रतिमेसाठी आग्रह धरणाऱ्या राहुल गांधींना आपल्या ‘रोड शो’साठी कृपाशंकर यांची उपस्थिती कशी चालते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

११.२३:
प्रख्यात सनईवादक  दिवंगत बिस्मिल्ला खॉं यांच्या कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. मात्र, राहुल गांधीच्या प्रचारयात्रेचा भाग म्हणून बिस्मिल्ला खाँ यांच्या मुलाने  सनईवादन केल्याचे  समजत आहे.

११.५०
राहुल गांधी यांचा ताफा लंका गेट येथे आल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या मदन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आदरांजली वाहिली. दरम्यान राहुल गांधींच्या या रोड शोवर भाजपच्या अनेक नेत्यांकडून सातत्याने टीकेचा ओघ सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी वाराणसीत अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच आपल्याला केजरीवाल किंवा राहुल गांधी यांच्या प्रचारयात्रेवर कोणताच आक्षेप नसल्याचे सांगितले. मात्र, ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना वाराणसीत प्रचार करण्यापासून रोखण्यात आले त्याबद्दल आपल्याला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Story img Loader