सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी (२१ सप्टेंबर) दुपारी नवी दिल्लीला गेले. त्यानंतर या दिल्ली भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राहुल नार्वेकरांनी दिल्लीत कुणाला भेटले आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (२२ सप्टेंबर) दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
राहुल नार्वेकर म्हणाले, “काही भेटीगाठी कायदेतज्ज्ञांबरोबर होत्या. एकूण अपात्रतेबाबतचा हा कायदा बदलत जाणारा आहे. त्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार या कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे त्याबाबत आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे किंवा या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणं आवश्यक आहे या संदर्भातील अनेक विषयांवर माझी अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली.”
“येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ”
“आपल्या सर्वांना माहिती आहे की, सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. तशीही आमची सुनावणी १४ सप्टेंबरला झालेली आहे. आमची पूर्वनियोजित सुनावणी होतीच. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली.
“गरज पडली तर पक्षाच्या प्रमुखांनाही बोलावण्यात येईल”
“गरज पडली तर पक्षाच्या प्रमुखांनाही बोलावण्यात येईल,” असं म्हणत राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावण्याबाबत सूचक वक्तव्य केलं.
हेही वाचा : सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “एका आठवड्याच्या आत…”
“अजित पवार गटाकडून काही तक्रार आली आहे का?”
अजित पवार गटाकडून काही तक्रार किंवा याचिका आली आहे का? या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्वी ज्या याचिका आल्या आहेत त्याबद्दलच मला माहिती आहे.”