गुजरात निवडणूक जिंकण्याचे स्वप्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुळीच पाहू नये असे म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून अमेठी या लोकसभा मतदार संघातून निवडून येतात. अमेठी हा गांधी आणि नेहरू परिवाराचा ५० वर्षांपासूनचा मतदार संघ आहे. मात्र इतक्या वर्षात राहुल गांधी किंवा त्यांच्या कुटुंबापैकी इतर कोणालाही  अमेठीचा विकास करता आला नाही तर ते देशाचा विकास कसा करतील? गुजरातमध्ये निवडणूक कशी जिंकतील? असे प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केले. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे जे निकाल लागले त्यावरून राहुल गांधींनी धडा घ्यावा असेही इराणी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या पक्षाला उत्तर प्रदेशात त्यांच्या ५ हमखास विजय मिळवून देतील अशाही जागा जिंकता आल्या नाहीत त्या काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये सत्ता मिळवण्याची स्वप्ने बघणे बंद केले पाहिजे. भाजप आणि गुजरातची जनता तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्हाला विकासाबाबत आणि प्रगतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींना हे पक्के ठाऊक आहे की अमेठीत जिल्हाधिकारी कार्यालयाची पायाभरणी भाजपने केली आहे. अमेठीत एक जिल्हाधिकारी कार्यालय काँग्रेसला इतक्या वर्षात उभारता आले नाही. चांगले रस्ते, सोयी सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा अमेठीच्या जनतेला पुरवता आल्या नाहीत त्या काँग्रेसने गुजरातचा विकास करण्याच्या बाता मारू नयेत असाही टोला इराणी यांनी लगावला.

राहुल गांधी जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स म्हणतात. कारण त्यांना सरकारचे चांगले निर्णय पटतच नाहीत. जीएसटीला काँग्रेसने सुरुवातीपासून विरोधच केला. मात्र जीएसटी परिषदेने सगळ्या पक्षांचे मत विचारात घेऊन करप्रणाली ठरवली. आमच्यावर टीका करताना राहुल गांधी हे सोयीस्करपणे विसरले आहेत असेही इराणी यांनी म्हटले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul should stop dreaming about sweeping gujarat polls smriti irani
Show comments