कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्त्व मिळमिळत असल्याची टीका विरोधकांनी केल्यानंतर आता स्वतः राहुल यांनी आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केलीये. पक्षविरोधी कारवाया करणाऱयांना कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाही. पक्षाची शिस्त न पाळणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 
पुढील काही महिन्यांत होत असलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजणाऱया कॉंग्रेसमधील काही नेत्यांना नाव न घेता इशारा दिलाय.
माझी आई आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या जरी सहनशील असल्या, तरी मी अजिबात सहन करणार नाही. मी अतिशय कडक आहे, असे राहुल गांधी यांनी दिल्लीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले. याच बैठकीत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, इंदिरा गांधी या माझ्या प्रेरणास्थान आहेत. जर मी एखादी गोष्ट करायची नक्की केले, तर ती करूनच दाखवतो. पक्षविरोधी कारवाया मी कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही.
सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिल्लीतील विधानसभा निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपसातील मतभेद मिटवून एकत्रितपणे काम करण्याची सूचना केली.

Story img Loader