मुझफ्फरनगरमधील दंगलग्रस्तांच्या कुटुंबीयांना दहशतवादी कृत्यांमध्ये ओढण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी त्यांची मदत घेतली, या राहुल गांधी यांच्या आरोपप्रकरणी विरोधी पक्षीयांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी कोणत्या अधिकारात हे वक्तव्य केले, असे विचारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करतानाच एखाद्या संसद सदस्यास किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यास गुप्तचर विभागाचे अधिकारी एवढी संवेदनाक्षम माहिती कशी देऊ शकतात, अशी विचारणा भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली.
सरकारला बाहेरून पाठिंबा देणारी समाजवादी पार्टी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही राहुल गांधी यांच्यावर टीका केली असून मुस्लिमांचा दहशतवादी संबंध जोडण्यात आला तर त्या समाजात दुही पेरली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था भारतीय युवांच्या संपर्कात आहे असे राहुल गांधी यांचे म्हणणे असेल तर सरकारने त्याविरोधात कोणती कारवाई केली याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी जावडेकर यांनी केली तर भाजपाचे अन्य नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे असल्याचे मत मांडले.
राहुल गांधी यांनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केले अशी विचारणा करून त्यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाबद्दल संशय उत्पन्न होईल आणि हे चांगले लक्षण नाही, असा इशारा समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी दिला.