रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना ज्यामुळे राजीनामा द्यावा लागला, त्या रेल्वेतील लाचखोरी प्रकरणाचा तपास तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक रणजित सिन्हा यांनी मंगळवारी म्हटले आहे. लाचखोरीचा तपास धीम्यागतीने करावा, यासाठी सीबीआयवर कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बन्सल यांचा पुतण्या विजय सिंगला याला रेल्वे मंडळाचे सदस्य महेशकुमार यांच्याकडून लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱयांनी ३ मे रोजी अटक केली. सीबीआयच्या अधिकाऱयांनी पद्धतशीरपणे कारवाई करून लाचखोरीचे हे प्रकरण उघडकीस आणले. सध्या आमच्यावर कोणताही दबाव नाही. भ्रष्टाचाराचा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे प्रकरण उघड केले, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. आता बन्सल यांचीही चौकशी करणार का, असा प्रश्न विचारल्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास सिन्हा यांनी नकार दिला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजून सुरू असल्याने यासंदर्भात आताच काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader