रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना साधी राहणी पसंत आहे. यामुळेच ते अन्य राजकीय नेत्यांपेक्षा आपले वेगळेपण टिकवून आहेत. मेरठ रेल्वेस्थानकावर त्याचा प्रत्यय देणारी एक घटना अलिकडेच घडली. मेरठ रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी अनेक भाजप कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते. या स्वागत समारंभापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी प्रभू चक्क चालत्या ट्रेनमधून उडी मारून उतरले. गाझियाबाद-मेरठ-सहारणपूर विद्युतीकरणाचे लोकार्पण करण्यासाठी ते येथे आले होते.
ट्रेन प्लॅटफॉर्मावर पोहोचताच स्वागतासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना प्रभूंनी दूरूनच पाहिले. स्वागतसमारंभ टाळण्यासाठी प्रभू चालत्या ट्रेनमधून अगोदरच उतरले. जेव्हा प्रभू चालत्या गाडीतून उतरले तेव्हा गाडीचा वेग बऱ्यापैकी कमी झाला होता. यानंतर ते तडक कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचावर पोहोचले. परंतु काहीही ऐकण्यास तयार नसलेल्या कार्यकर्त्यांनी मंचावर जाऊन त्यांचे स्वागत केले. गाझियाबाद-मेरठ-सहारणपूर विद्युतीकरणाचे लोकार्पण केल्यानंतर प्रभूंनी एस्क्लेटर आणि लिफ्टचा शिलान्यास केला. यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांत जेवढे काम केले नाही, त्यापेक्षा किती तरी जास्त काम गेल्या दोन वर्षांत आपल्या सरकारने केल्याचे यावेळी प्रभू म्हणाले. केवळ दोन वर्षांत साठ वर्षांच्या कामाची बरोबरी साधणारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे सांगत केद्र सरकारच्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले, पहिल्यांदा दररोज चार किलोमीटरची नवी रेल्वेलाईन टाकली जात असे, आम्ही दरदिवशी १९ किलोमीटर रेल्वेलाईन टाकण्याचे उद्दिष्ट साध्य केले. वर्षभरात गरजेनुसार पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये नवीन ट्रेन नक्की धावतील. लवकरच हाय स्पीड आणि सेमी स्पीड ट्रेन आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा