दिल्लीच्या सरकारी बाबूंमध्ये ‘मॅन ऑफ आयडियाज्’ अशी ओळख असलेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू रेल्वेला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी अभिनव संकल्पना राबवणार आहेत. ही संकल्पना आहे बहुपर्यायी परिवहनाची! सुरेश प्रभू यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘देवगडच्या गोगटेंना त्यांच्या आमराईतील आंबे रायपूरच्या रमणसिंह यांच्याकडे पाठवायचे असतील तर त्याची जबाबदारी रेल्वेच्या माध्यमातून स्थापले जाणारे हे महामंडळ घेईल!’. रस्ता, रेल्वे, हवाई किंवा जल वाहतुकीपैकी कोणत्याही मार्गाने हे आंबे रायपूरला पाठवण्यात येतील. त्यामुळे गोगटय़ांना रायपूरला आंबे कसे पाठवावेत, याचा विचार करण्याची गरज नाही. गोगटेंचे आंबे देवगडहून रायपूरमधील इच्छित स्थळी पोहोचवण्याची डोकेदुखी रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापण्यात येणारे ‘बहुपर्यायी परिवहन व्यवस्था महामंडळ’ सांभाळणार! या अभिनव योजनेतून होणाऱ्या मालवाहतुकीतून रेल्वेला कोटय़वधींचा महसूल मिळणार आहे.
परिवहन सुधारणांच्या सकारात्मक स्पर्धेतून प्रभू यांना ही संकल्पना सुचली. केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधण्याची गती दर दिवशी ३० किलोमीटपर्यंत नेण्याचा चंग बांधला आहे. रस्त्यांचे जाळे सुधारल्यास रेल्वेने होणारी मालवाहतूक कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम होईल. त्यामुळे भविष्यातील निधीची बेगमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हे बहुपर्यायी परिवहन व्यवस्था महामंडळ स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या महामंडळाचे काम परिवहन व जहाजबांधणी मंत्रालयांशी समन्वय साधून चालेल. देशभर रेल्वे स्थानक परिसरातील जागेत त्यासाठी मोठमोठी टर्मिनल्स उभारली जातील. ज्यांना देशभर कुठेही माल पाठवायचा आहे त्यांना या टर्मिनल्समध्ये माल आणून देता येईल. इच्छित ठिकाणी माल पोहोचवण्यासाठी ‘होलिस्टक’ व ‘लॉजिस्टक’ पर्यायांचा विचार करण्यात येईल. वाहतुकीच्या बहुपर्यायी माध्यमांचा विचार करून खर्च व वेळ वाचवणाऱ्या माध्यमातून हा माल इच्छित स्थळी पाठवण्यात येईल. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महामंडळात तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाने या महामंडळास नाव दिले आहे – मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट सिस्टिम कॉपरेरेशन! महामंडळाच्या निर्मितीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे रेल्वे मंत्रालयातील अत्यंत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हे अधिकारी म्हणाले की, स्पर्धेच्या काळात प्रत्येकाला अगदी घरोघरी पोहोचणारी उपाययोजना हवी असते. वेळ व पैसा वाचाविणे हा महामंडळाचा प्रमुख उद्देश असेल. कमी खर्चात प्रभावी काम करणारी दळणवळण क्षेत्रातील ही सर्वात प्रभावी यंत्रणा असेल. ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रेल्वेला उत्पन्न मिळेल व नागरिकांना सुविधा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा