पीटीआय, नवी दिल्ली : दिल्ली परिसरात बुधवारी सकाळी मध्यम स्वरुपाचे धुके पसरले होते. त्यामुळे ४०० मीटपर्यंतचेच दिसू शकत होते. यामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुमारे १८ रेल्वेगाडय़ा विलंबाने धावत होत्या. दिल्ली विमानतळाचे कामकाज मात्र सुरळीतपणे झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तथापि मंगळवारी रात्री चंडीगढ, वाराणसी व लखनौतील खराब हवामानामुळे तीन उड्डाणे दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आली.
भारतीय हवामान विभागाने सांगितले, की पहाटे अडीचला पालम विमानतळावर ४०० मीटपर्यंतची सर्वात कमी दृश्यमानता नोंदवली गेली. तर सफदरजंग विमानतळावर पहाटे साडेपाचला ही दृश्यमानता ५०० मीटपर्यंत होती. या दोन्ही ठिकाणी मंगळवारची दृश्यमानता पातळी ५० मीटपर्यंतच होती. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने, सांगितले, की मध्य उष्णकटिबंधीय स्तरावरील नैऋत्येकडील वाऱ्यांमुळे दृश्यमानतेत सुधारणा झाली. तसेच गेल्या २४ तासांत तापमानवाढीमुळे दाट धुक्याचा थर मध्यम स्वरुपाचा झाला. तथापि, कमी तापमान, उच्च आद्र्रतेमुळे पंजाब, हरियाणा, वायव्य राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडच्या काही भागांवर दाट ते अत्यंत दाट धुक्याचा एक थर कायम होता. भटिंडा येथे पहाटे साडेपाच वाजता ही दृश्यमानता शून्यावर आली. गंगानगर, अमृतसर व बरैली येथे २५ मीटर व वाराणसी, बहराइच व अंबाला येथे धुक्यामुळे ५० मीटपर्यंतची दृश्यमानता होती. येत्या काही दिवसांत किमान तापमान पाच अंशांपर्यंत व कमाल तापमान २० अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.