माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) उपमहानिरीक्षक महेश अगरवाल भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भाजपने सोमवारी सीबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी केलेल्या पाण्याच्या फवा-यांमुळे पक्षाचे दहा कार्यकर्ते जखमी झाले.
स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपचे नेते हरमोहन धवन यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. चंदीगड सीबीआयचे उपमहानिराक्षक महेश अगरवाल यांचे पवनकुमार बन्सल यांच्याशी घरगुती संबंध असून, त्यांच्या भाच्याने केलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा ते प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
स्थानिक सीबीआय कार्यालयावर चालून जाणा-या मोर्चाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांनी उभे केलेले अडथळे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या फवा-यांचा मारा केल्याने भाजपचे दहा कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. त्यामध्ये काही स्त्रियादेखील आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
“आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. कोणती ही पूर्वसूचना न देताच पोलिसांनी आमच्यावर पाण्याच्या फवा-यांचा मारा केला,” असे धवन म्हणाले.
अगरवाल यांनी हस्तक्षेप करून बन्सल यांच्या विरोधील तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा धवन यांनी यावेळी केला. त्यांनी अगरवाल यांना त्वरित निलंबित करण्याची व त्यांच्या विरोधात चौकशी समिती नेमण्याची मागणी केली.  

Story img Loader