रेल्वे अर्थसंकल्पात सुरेश प्रभू यांनी रेल्वेतील स्वच्छतेवर भर देणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी रेल्वे प्रशासन याबाबत कितपत गंभीर आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना पुरविण्यात येणारी ब्लँकेटस दोन महिन्यातून एकदाच धुतली जातात, अशी कबुली खुद्द रेल्वे खात्याकडूनच देण्यात आली आहे. रेल्वे खात्याचे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यांतील बेडशीट आणि उश्यांची कव्हर्स रोज धुतली जातात. मात्र, ब्लँकेटस दोन महिन्यातून एकदाच धुण्यात येतात, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी यापेक्षा प्रवाशांनी स्वत:च्या चादरी आणि उशा आणण्याची पूर्वीची पद्धत चांगली होती, असा उपरोधिक टोला लगावला. त्याला प्रत्युत्तर देताना सिन्हा यांनी हा चांगला सल्ला असल्याचे म्हटले. प्रवाशांना पूर्वीच्याच पद्धती चांगल्या वाटत असतील तर रेल्वे प्रशासनाला कोणतीही अडचण नाही, असेही सिन्हा यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा