बालासोर/ नवी दिल्ली : अपघाताचे मूळ कारण आणि कथित गुन्हेगारी कृत्यामागील व्यक्तींची ओळख पटल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितल्यानंतर काही तासांनी अपघाताच्या सीबीआय चौकशीची शिफारस रेल्वे मंडळाने केंद्र सरकारकडे केली. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत फेरफार करून घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अपघातास चालक किंवा सिग्नल यंत्रणा कारणीभूत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या रचनेत (सेटींग) फेरफार झाल्याचा संशय रेल्वे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर सीबीआय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी संध्याकाळी भुवनेश्वरमध्ये जाहीर केले. घटनेचा ‘कवच’ या टक्कररोधी प्रणालीशी काहीही संबंध नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. पॉइंट मशीनच्या सेटींगमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळले आहे. तो कसा आणि का केला गेला, हे चौकशीतून उजेडात येईल, असेही ते म्हणाले. हा अपघात ‘पॉइंट मशीन’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ प्रणालीशी संबंधित आहे. ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मध्ये बदल का केले गेले, हा कळीचा मुद्दा असल्याने सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन मार्गिका पूर्ववत
पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या दोन मुख्य मार्गिकांवरील दुर्घटनाग्रस्त डबे हटवून त्या वाहतूकयोग्य करण्यात आल्या आहेत. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गिकांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली असून आता ओव्हरहेड इलेक्ट्रिक यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. बुधवापर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, असेही ते म्हणाले.
‘इलेक्ट्रिक पॉइंट मशीन’ म्हणजे काय?
‘पॉइंट मशीन’ हे त्वरित संचालन आणि ‘पॉइंट स्विच’ला लॉक करण्यासाठीचे रेल्वे सिग्नल यंत्रणेतील महत्त्वपूर्ण उपकरण आहे. या यंत्रणेने चोख काम केले नाही तर रेल्वे वाहतूक नियंत्रणावर गंभीर परिणाम होतो. उपकरण कार्यान्वित करताना त्रुटी राहिल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. पॉइंट मशिनमधील गोंधळामुळे कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य रेल्वेमार्गाऐवजी ‘लूप लाइन’मध्ये गेली व तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेमके काय घडले?
– सिग्निलग यंत्रणेचे प्रधान कार्यकारी संचालक संदीप माथूर आणि परिचलन आणि व्यापार विकास सदस्य जया वर्मा- सिन्हा रेल्वे मंडळाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघात कसा झाला असावा, त्याची माहिती दिली.
– कोरोमंडल एक्स्प्रेससाठी दिशा, मार्ग आणि सिग्नल निश्चित करण्यात आले होते. ती अतिवेगाने धावत नव्हती तर त्या भागातील निर्धारीत वेगमर्यादेतच ती पुढे जात होती. लूप लाइनमध्ये प्रवेश करण्यासाठी तिला हिरवा सिग्नल मिळाला, मात्र तेथे एक मालगाडी थांबली होती. ‘इंटरलॉकिंग सिस्टम’च्या कामकाजातील बदलामुळे दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी आढळते.
– हिरव्या सिग्नलचा अर्थ असा असतो की, तुमचा पुढील मार्ग निर्धोक आहे आणि तुम्ही निर्धारित वेगाने गाडी चालवू शकता. या विभागातील निर्धारीत वेग मर्यादा १३० किमी प्रतितास होती आणि गाडीचा चालक १२८ किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होता. या तपशीलाची खातरजमा ‘लोको लॉग’मधून करण्यात आली आहे.
– बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन १२६ किमी प्रतितास वेगाने धावत होती. दोन्ही गाडय़ांच्या बाबतीत अती वेगाचा प्रश्नच नव्हता. अपघात फक्त कोरोमंडल एक्सप्रेसमुळे घडला. ती लोखंडाने भरलेल्या अवजड मालगाडीला धडकल्याने अनर्थ ओढवला.
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव
अनेक विरोधी पक्षांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अपघाताबाबत वरिष्ठ पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या रेल्वे मंत्र्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ बघावा आणि त्यांनी अपघाताचे राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.