मुंबई-दिल्ली हा रेल्वे मार्ग देशातील एक वर्दळीचा रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा देशातील एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग म्हणूनही या रेल्वे मार्गाची ओळख आहे. सध्या मुंबई-दिल्ली हे १३८६ किलोमीटरचे अंतर राजधानी एक्सप्रेस १६ तासांत पार करते, दुरंतो एक्सप्रेस १७ तास १५ मिनिटांत पार करते. तर ताशी ७५ ते ९० किलोमीटर असा वेग असलेल्या सर्वसाधारण रेल्वे गाड्यांना हेच अंतर पार करायला १८ ते २२ तास लागतात.
आता याच मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचा वेग भविष्यात वाढणार आहे. राजधानी एक्सप्रेस सारख्या विशेष गाड्या या ताशी १६० किलोमीटर वेगाने तर सर्वसाधारण गाड्याही १०० किलोमीटर वेगाने सहज धावू शकणार आहेत. यामुळे मुंबई-दिल्ली हे अंतर कमी तासांत पार करणे शक्य होणार आहे.
मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड यंत्रणा यांच्यात सुधारणा केल्या जात आहेत. जास्त वेग रहावा यासाठी रेल्वे ट्रॅकच्या संरचनेतही योग्य ते बदल केले जात आहेत. यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पुर्ण झाले असून मार्च २०२४ पासून या मार्गावर रेल्वे ताशी १६० किलोमीटर वेगाने धावेल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर रेल्वे मार्गावरील वाढलेला वेग आणि मर्यादित थांबे यामुळे मुंबई-दिल्ली हे अंतर रेल्वेने १३ तासांत पार करणे मार्च २०२४ पासून सहज शक्य होईल असं पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे मुंबई आणि दिल्ली दरम्यान विमान प्रवास करणारे २५ टक्के प्रवासी हे भविष्यात रेल्वे प्रवासाकडे वळतील असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भविष्यात मुंबई दिल्ली मार्गावरील रेल्वे गाड्यांचे डबे हे ‘एलबीएच’चे असतील. रेल्वे रुळांखाली असणाऱ्या आणि रेल्वे रुळांना धरुन ठेवणाऱ्या स्लिपरची संख्या सुद्धा दर किलोमीटरमागे १०० ने वाढवली जात आहे. यामुळे वेगवान रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या सर्व सुधारणांमुळे भविष्यात या मार्गावरील रेल्वे गाड्यांची संख्याही २० टक्के वाढवणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वे, पश्चिम-मध्य रेल्वे, उत्तर-मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वे अशा ४ रेल्वेच्या विभागांमार्फत एकुण ६ हजार ६६१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे.