पीटीआय, नवी दिल्ली
जळगावमधील बुधवारच्या लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वेच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डाने गुरुवारी दिली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू, तर १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
तपास पथकात प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी (पीसीएसओ), प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त (पीसीएससी), प्रधान मुख्य विद्याुत अभियंता (पीसीईई), प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता (पीसीएमई) आणि प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक (पीसीसीएम) यांचा समावेश आहे. या पथकाने अपघाताचा तपास सुरू केला आहे. त्यात प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रचार विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले. घटनेचा सर्व अंगांनी तपास करून शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कुमार पुढे म्हणाले.
हेही वाचा : ‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब
बुधवारी सायंकाळी आग लागल्याच्या अफवेमुळे लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतून रुळावर उड्या घेतल्या. याच वेळी लगतच्या रेल्वे मार्गावरून वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रवाशांनी अलार्म चेन ओढून पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली उतरण्याचे कारण शोधण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) बुधवारी सायंकाळीच प्राथमिक तपास सुरू केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी ‘पीटीआय’ला दिली. आता हा तपास पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
धूर किंवा ठिणग्या नाहीच
आगीच्या अफवेमुळे पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अलार्म चेन खेचल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या गाडीतून रेल्वे रुळावर उड्या घेतल्या. तेव्हा वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांच्यापैकी अनेकांना चिरडले. दरम्यान, रेल्वेच्या कोणत्याही बोगीतून आगीच्या ठिणग्या किंवा धूर आला नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आगीची अफवा कोणी पसरवली आणि प्रवासी कशामुळे गाडीतून बाहेर पडले हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.