रेल्वेचे अर्थकारण ‘घोर संकटात’ असल्याची कबुली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली असून, कमी गुंतवणुकीचा रेल्वेच्या सेवांवर परिणाम झाला असल्याचे मत व्यक्त केले.
रेल्वेमध्ये अधिक गुंतवणुकीची गरज असल्याचे सांगताना प्रभू म्हणाले की, हजारो कोटी रुपयांचा तोटा सोसणाऱ्या या सर्वात मोठय़ा सरकारी वाहतूक सेवेमध्ये निधीची गुंतवणूक करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी (पेन्शन फंड) हा एक संभाव्य मार्ग आहे. गुंतवणूक वाढल्यास येत्या काही वर्षांत रेल्वे हे विकासाचे साधन होऊ शकते आणि सुधारित पायाभूत सोयींसह सकल राष्ट्रीय उत्पन्नात अडीच ते तीन टक्क्य़ांचे योगदान देऊ शकते.
तथापि, रेल्वेचे अर्थकारण घोर संकटात आहे. देशाच्या जास्तीत जास्त भागांना जोडण्याच्या उद्देशाने आपले जाळे विस्तारण्यासाठी रेल्वेला प्रचंड प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे. प्रवाशांव्यतिरिक्त जादा मालवाहतूक करण्यासाठी ३० ते ४० हजार किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग टाकणे आवश्यक आहे. तथापि, अशा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या संस्था भारतात नाहीत, असा खेद प्रभू यांनी एका परिषदेत बोलताना व्यक्त केला. गुंतवणूक करण्यासाठी पेन्शन फंड हा एक संभाव्य मार्ग असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
नक्षलवादग्रस्त भागांचे उदाहरण देऊन रेल्वेमंत्री म्हणाले, की सुरक्षा यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याव्यतिरिक्त, रेल्वेच्या अधिक चांगल्या पायाभूत सोयींमुळे अशा भागात गुंतवणूक येईल
आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

Story img Loader