नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी हा पदभार पियुष गोयल यांच्याकडे होता. नव्या रेल्वेमंत्र्यांनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या खात्याचा कारभार हाती घेतला. त्यानंतर पहिल्याच दिवशी अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयातील सर्व कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील, या शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुपारी ३ ते रात्री १२ अशा प्रकारे असतील असा निर्णय घेतला. तसेच, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास देखील सांगितले. त्यामुळे नवे अर्थमंत्री कडक शिस्तीचे आणि कठोर असतील असं वाटू लागलं. पण आता अश्विनी वैष्णव यांच्या स्वभावाची दुसरी बाजू समोर आली आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये अश्विनी वैष्णव आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारताना दिसत आहेत. “आपण असं काम करुयात की खूप मजा येईल. असं वाटेल की काम करून मजा आली”, असं वैष्णव म्हणताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यानंतर कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दुसऱ्या एका व्यक्तीची ओळख करून दिली. सिग्नल विभागातील हे इंजिनिअर रेल्वेमंत्र्यांच्याच कॉलेजमधून शिक्षण घेतलेले आहेत, असं या अधिकाऱ्याने सांगताच रेल्वेमंत्र्यांनी त्यांना बोलावून घेतलं.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय

…आणि रेल्वेमंत्र्यांनी त्यांना मिठीच मारली!

हे इंजिनिअर जवळ आल्यानंतर वैष्णव यांनी त्यांना मिठी मारली. त्यानंतर वैष्णव यांनी त्यांच्या कॉलेजमधली एक आठवण सांगितली. “आजपासून तुम्ही मला बॉस म्हणायचं. आमच्या कॉलेजमध्ये एक पद्धत होती. तिथे ज्युनिअर्स सीनिअर्सला सर किंवा नावाने हाक मारत नव्हते. ते सीनिअर्सला बॉस म्हणायचे. आता तुम्ही देखील मला आजपासून बॉस म्हणायचं”, असं अश्विनी वैष्णव यांनी संबंधित इंजिनिअरला सांगताच कार्यालयात हास्याची लकेर उमटली.

 

कॉलेजचे गोल्ड मेडलिस्ट होते अश्विनी वैष्णव!

अश्विनी वैष्णव हे माजी आयएएस अधिकारी आहेत. आयआयटी कानपूरमधून त्यांनी शिक्षण घेतलं असून २०१९पासून ते भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत. जोधपूरच्या एमबीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेलं होतं. त्या कॉलेजचे ते गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी राहिले आहेत. ओडिशाच्या बालासोर आणि कटक जिल्ह्यांमध्ये वैष्णव यांनी जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway minister ashwini vaishnav viral video in social media on calling boss pmw