रेल्वे भ्रष्टाचारप्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या भाच्यासह अटक झालेले रेल्वे बोर्डाचे सदस्य महेशकुमार यांना विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची सीबीआय कोठडी दिली.
रेल्वे बोर्डात उच्च पद मिळावे यासाठी बन्सल यांचा भाचा विजय सिंगला यांच्यासह सहा जणांबरोबर महेशकुमार यांनी दहा कोटी रुपयांचा सौदा केला होता. सिंगला यांच्यासह ते सहा जणही सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. महेशकुमार हेच या भ्रष्टाचाराला मुख्यत: कारणीभूत असल्याचे कारण देत सीबीआयने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे. महेशकुमार हे चौकशीत सहकार्य करीत नसून उत्तरे देणे टाळत आहेत, असे सीबीआयच्या वतीने अ‍ॅड. अक्षय गौतम यांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. स्वर्णकांत शर्मा यांना सांगितले. आणखी दोन संशयितांनाही या प्रकरणात अटक करायची असल्याचेही त्यांनी न्यायालयास सांगितले आणि त्यासाठी महेशकुमार यांना कोठडी देण्याची मागणी केली.

Story img Loader