प्रवाशांची सुरक्षितता यालाच आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे सध्या रेल्वेला उशीर का होतोय याची प्रवाशांना पुरेपूर कल्पना आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी रेल्वेच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. रेल्वेने सुरक्षेला प्राधान्य दिल्याने रेल्वे अपघातात प्रचंड घट झाली असून २०१७-१८ मध्ये रेल्वे अपघाताचे प्रमाण ६२ टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. मागील तीन महिन्यात रेल्वेचा वक्तशीरपणा ६५ टक्क्यांनी घटल्याचा अहवालाच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला. गेल्या काही वर्षांतील रेल्वेची वेळेबाबतची ही अत्यंत सुमार अशी कामगिरी ठरली आहे.
काही महिन्यांपूर्वी रेल्वेचा ८० टक्के वक्तशीरपणा म्हणजेच ८० टक्के रेल्वे वेळेवर धावत होत्या. गेल्या अनेक दशकांपासून रखडलेली ट्रॅकची दुरूस्ती हे रेल्वेला उशीर होण्यामागचे प्रमुख कारण आहे. रेल्वेला का उशीर होतोय याची प्रवाशांना कल्पना आहे. भविष्यात चांगली सेवा मिळावी यासाठी अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळेच रेल्वेला उशीर होतोय. पूर्वीच्या सरकारने आमच्यासाठी अनेक कामे प्रलंबित ठेवल्याचे प्रत्येकाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
गोयल म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३-०४ मध्ये रेल्वे सुरक्षा निधीची घोषणा केली होती. परंतु, मागील संपुआ सरकारच्या म्हणजे १० वर्षांच्या काळात याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रवास हा असुरक्षित झाला. त्यामुळे आमच्यासमोर आता मोठे काम आहे.
वर्ष २००९ ते २०१४ या कालावधीत जितका खर्च रेल्वेवर झाला त्याच्या दुप्पट खर्च आम्ही मागील चार वर्षांत केला. रोज नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचा वेग ४.१ किमी (२००९-१४) वरून ६.५३ किमी (२०१४-१८) इतका झाला आहे. २०१७-१८ मध्ये सुमारे ५ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे नुतनीकरण करण्यात आले. येत्या सहा ते सात वर्षांत रेल्वेचे उत्पन्न दुप्पट करून रेल्वेला स्वंयभू बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशातील ६७५ रेल्वे स्थानकावर आम्ही मोफत व्हायफाय दिले असून हा आकडा सहा हजारपर्यंत वाढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.