लागोपाठ दोन दिवस मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलचे डबे घसरल्याने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या सर्व १६ विभागांच्या महाव्यवस्थापकांची तातडीने बैठक बोलावली आहे. ही बैठक नवी दिल्लीमध्ये होते आहे.
रेल्वेचे डबे घसरण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने घडताहेत. त्याचबरोबर रेल्वे अपघातांचे प्रकारही गेल्या काही महिन्यांत सातत्याने घडले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलचे सहा डबे मंगळवारी सकाळी रुळावरून घसरले. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सोमवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरही लोकलचे डबे घसरले होते. त्यामुळे संध्याकाळच्या गर्दीवेळी घरी परतणाऱया चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. मुंबईत लागोपाठ दोन दिवस या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ स्थानकाजवळ एक्स्प्रेस गाडी सायडिंगला लावल्याने संतप्त प्रवाशांनी रास्तारोको केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway minister suresh prabhu called important meeting in delhi