भारतीय रेल्वे विभाग मेड इन इंडिया या संकल्पेवर जास्त भर देत असून रेल्वे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. आता वंदे भारत रेल्वे प्रतितास २०० किमीच्या वेगाने धावणार असून त्यावर काम करण्यात येत आहे. तशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली.
आज लोकसभेत रेल्व बजेटवर चर्चा करण्यात आली. यावेळी वैष्णव यांनी रेल्वे विभाग कोणत्या गोष्टींवर काम करत आहे, याची सविस्तर माहिती दिली. “आपल्याला परिस्थितीनुसार शिकावं लागेल. २०१७ मध्ये आधूनिक रेल्वेवर काम करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वंदे भारत रेल्वेंची निर्मिती करण्यात आली. भारताचे हे यश असून यामुळे जगातील रेल्वे जगत आश्चर्यचकित झाले आहे,” असे वैष्णव म्हणाले.
तसेच त्यांनी वंदे भारत रेल्वेची विशेषता तसेच त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाबाबत माहिती दिली. “भारताबहेर निर्मिती होत असलेल्या रेल्वेबाबत बोलायचे झाले तर एका रेल्वेसाठी जवळपास २९० कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र वंदे भारत रेल्वेची निर्मिती फक्त ११०-११५ कोटी रुपयांमध्ये होते. कमी खर्चात रेल्वेनिर्मिती होत असली तरीही विदेशी रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे तांत्रिकदृष्ट्या कोठेही कमी नाही,” असं वैष्णव यांनी सांगितलं.
तसेच त्यांनी प्रत्येक महिन्यात आठ वंदे भारत रेल्वे तयार केल्या जातील, असं सांगितलं. “आगामी काळात बनवल्या जाणाऱ्या वंदे भारत रेल्वे या अपग्रेडेड आहेत. या रेल्वेमध्ये एअर कुशन आहे. यामुळे रेल्वेप्रवास सुखकर होणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून या रेल्वेंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार असून सुरुवातीला चार रेल्वे तर नंतर आठ रेल्वेंची निर्मिती केली जाईल. त्यासाठी सर्व प्रोडक्शन युनिट्सना अपग्रेड केले जात आहे. याच पद्धतीने रेल्वेंची निर्मिती सुरु झाली तर आगामी तीन वर्षात ४०० रेल्वेंची निर्मिती करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. रेल्वेचा वेग ताशी २०० किमी करण्यासाठी प्रयत्न केला जात असून सर्व तंत्रज्ञान अपग्रेड करण्यात येत आहे, “असे वैष्णव म्हणाले.