ओडिशामधील कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघाताने देशभरात शोककळा पसरली. अनेकजण या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहेत. तसेच हा अपघात नेमका का घडला यावर तर्कवितर्क लावत आहेत. अशातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेबाबत मोठी बाब समोर आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्येच सिग्नल यंत्रणेतील बिघाडाबाबत गंभीर इशारा दिल्याचं वृत्त ‘द प्रिंट’ने दिलं आहे. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्याच्या एका पत्राचा हवाला दिला आहे. त्यामुळे फेब्रुवारीत इशारा देऊनही त्याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नसल्याचा आरोप रेल्वे मंत्रालयावर होत आहे.
९ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात एका एक्स्प्रेस ट्रेनच्या सिग्नलमधील गंभीर बिघाडाबाबत माहिती दिली होती. हा बिघाड ८ फेब्रुवारीला म्हैसूर विभागातील संपर्क क्रांती एक्स्प्रेसबाबत झाला होता.
नेमकं काय घडलं होतं?
या पत्रानुसार, संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या रेल्वेमार्गात एका ठिकाणी आपोआप बदल झाले होते. यामुळे त्या रेल्वेचा प्रवास चुकीच्या दिशेने होणार होता. मात्र, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे रेल्वे चुकीच्या मार्गावर जाण्याआधीच थांबवण्यात आली आणि मोठं संकट टळलं होतं. याच घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहून सिग्नल यंत्रणेत दुरुस्त न झाल्यास त्यामुळे भीषण अपघात होऊ शकतो, असा गंभीर इशारा दिला होता.
हेही वाचा : “मोदी दिवसातून पाचवेळा ड्रेस…”, ओडिशा रेल्वे अपघातानंतर काँग्रेसचा हल्लाबोल, VIDEO ट्वीट करत म्हणाले…
दरम्यान, रेल्वे विभागात रेल्वेच्या सुरक्षेसाठी गँगमन, स्टेशनमास्टर यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, स्टेशनमास्टरला अनेक ठिकाणी १२ तासांची शिफ्ट करावी लागत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने एप्रिलमध्ये माहिती अधिकारात रेल्वे मंत्रालयाकडून मागितलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या ३९ विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. ट्रॅफिक असिस्टंट, गुड गार्ड, जुनियर-सिनियर टाईमकीपर, क्लर्क कम टायपिस्ट, स्टेशन मास्टर अशा ग्रुप सीच्या ३ लाख ११ हजार जागा रिक्त आहेत. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ३ हजार जागा रिक्त आहेत.