रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आता प्रवाशांना काही सेकंदातच रेल्वेगाडीचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. ‘डिजिटल पेमेंट’ला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. आयआरसीटीसीनं IRCTC तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि सुटसुटीत केली आहे. ई-पेलेटरच्या सहकार्यानं ‘बुक नाऊ पे लेटर’ चेकआऊट ही सुविधा सुरू केली आहे. रेल्वे राज्य मंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली. ई-पेलेटरद्वारे रेल्वे प्रवाशांना एका क्लिकनं आणि ओटीपीच्या मदतीनं काही सेकंदातच तिकीट आरक्षित करता येणार आहे. क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग आदी पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे.

यापूर्वी रेल्वेचं तिकीट आरक्षित करताना पॅन किंवा आधार कार्ड क्रमांकासह सर्व माहिती भरावी लागत होती. त्यासाठी वारंवार साईन-अप करावं लागत होतं. पण रेल्वेनं सुरु केलेल्या या नवीन सुविधेमुळं तिकीट आरक्षित करण्यासाठी आता वारंवार साईन-अप करण्याची गरज भासणार नाही, असं रेल्वे राज्य मंत्र्यांनी सांगितलं. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर या सुविधेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर नियम आणि अटींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तिकीट आरक्षित केल्यानंतर प्रवाशांना १४ दिवसांच्या आत त्याचे पैसे ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहेत. त्यामुळं आता तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया पूर्णपणे कॅशलेस आणि डिजिटल होणार आहे. दरम्यान, रेल्वे तिकीट आरक्षित केल्यानंतर त्याचे पैसे ऑनलाईन भरता येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं ट्विटद्वारे दिली आहे.

रेल्वेचं तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीनं पे ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आयआरसीटीसीच्या ग्राहकाला आपल्या घरी तिकिटाची डिलिव्हरीही घेता येणार आहे. यासाठी डिलिव्हरीचा पर्याय निवडून रोख किंवा डेबिट कार्ड अथवा क्रेडिड कार्डद्वारे पैसे देता येणार आहेत. आयआरसीटीसीसाठी ‘पे ऑन डिलेव्हरी’ सुविधा देणारी कंपनी ‘अँड्युरिल’नं ही घोषणा केली होती. काही क्षणात तात्काळ तिकीटे बुक करता येतात. ‘पे ऑन डिलिव्हरी’ सेवेमुळे पेमेंट गेटवेची गरज नसते. यामध्ये ग्राहकाला काही सेकंदातच तिकीट बुक करता येतं.

Story img Loader