रेल्वे फलाट स्वच्छतेसाठी आता नियमित कार्यक्रम आखला गेला आहे. त्यानुसार, रेल्वेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून दररोज फलाटांची स्वच्छता केली जाते. अनेकदा अनेक बेघर कुटुंबीय रेल्वे फलाटालाच आपलं घर मानतात अन् पाऊस-थंडीतून वाचण्याकरता फलाटांवर आसरा शोधतात. स्वच्छतेच्या वेळी या बेघर कुटुंबीयांना उठवलं जातं. पण अनेकवेळा अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांना जागा रिकामी करण्यास सांगितलं जातं. लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकातही असाच प्रकार घडला आहे.

लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी बेघर कुटुंबावर आणि प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशांवर थंड पाणी शिंपडले. फलाट स्वच्छ करण्याच्या उद्देशाने हे थंड पाणी शिंपडण्यात आल्याचं म्हटलं जातंय. इनोव्हेशन फॉर चेंज इनोव्हेटिव्ह पाठशाळा या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य चहा वाटण्यासाठी स्थानकावर पोहोचले असताना ही घटना उघडकीस आली. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हेही वाचा >> Crime News : दर महिन्याला निश्चित पगार, प्रवास भत्ता आणि बरंच काही… मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश

२५ डिसेंबरच्या रात्री कडकडीत थंडीत रेल्वे फलाटावर झोपी गेले. पण स्थानक परिसर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर थंड पाणी फेकून त्यांना जागं केलं. संस्थेच्या सदस्यांनी सांगितलं की, आम्ही ख्रिसमसनिमित्त तिथे चहा वाटण्याकरता गेलो होतो. तेथे काही गरीब कुटुंबे आम्हाला ओल्या कपड्यांमध्ये थरथर कापताना दिसली. त्यामुळे आम्ही त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आम्हाला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कृतीबद्दल सांगितलं. ही घटना केवळ अमानुषता दर्शवत नाही तर रेल्वे प्रशासनाची असंवेदनशीलताही दर्शवते.”

रेल्वे फलाट स्वच्छ करणं नित्याचं कर्तव्य असलं तरीही असे कृत्य करण्यास सफाई कर्मचाऱ्यांना परवानगी नसते. प्लॅटफॉर्म साफ करणे नियमित देखभालीचा भाग आहे. परंतु, लोकांना अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ शकत नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

संस्थेने यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीतून रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसंच, आवश्यक भासल्यास हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडेही पाठवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader