मध्य प्रदेशमधील हुरहानपूरमध्ये बुधवारी एक विचित्र दुर्घटना घडली. वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे हादरा बसल्याने रेल्वे स्थानकाची संपूर्ण इमारतच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना नेपानगर ते असीगढदरम्यान घडली. पुष्पक एक्सप्रेस ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने रेल्वे स्थानकामधून गेली. त्यानंतर ही ट्रेन जंगली भागामध्ये असणाऱ्या चांदनी रेल्वे स्थानकासमोरुन त्याच वेगाने जात असताना चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत ट्रेनच्या वेगामुळे निर्माण झालेल्या हादऱ्याने काही क्षणांमध्ये कोसळली. रुळांना लागून असणारा इमारतीचा प्लॅटफॉर्मकडील भाग प्लॅटफॉर्मवर कोसळला.
११० किमी वेगाने गेलेल्या ट्रेनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हादरा बसला की स्थानक अधीक्षक कक्षाच्या खिडकांच्या काचा फुटल्या. रेल्वे स्थानकातील बोर्ड खाली पडले आणि क्षणभरामध्ये लॅटफॉर्मवर इमारतीच्या अवशेषांचा ढीगारा पडला. या ठिकाणी गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी तैनात असणारे एएसएम प्रदीप कुमार यांनी स्वत:च्या डोळ्यादेखत हा सारा प्रकार पाहिला. इमारत पडू लागल्याचं लक्षात आल्यानंतर कुमार यांनी सुरक्षित स्थली धाव घेतली. कुमार यांनी तातडीने भुसावळ एडीआरएम मनोज सिंहा, खंडवा एडीएन अजय सिंह आणि वरिष्ठ डीएन राजेश चिकळे यांना यासंदर्भातील माहिती दिली.
Railway station building collapsed at train speed in Burhanupar: Pushpak Express passed from Chandni railway station at a speed of 110 kmph, the building collapsed with vibration #news pic.twitter.com/k36RiYEuJu
— Amber’s (@ambernewss) May 27, 2021
माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि नक्की काय घडलं याची माहिती घेतली. या ठिकाणी भुसावळ, खंडवा, बुरहानपुरच्या आरपीएफ आणि जीआरपी जवानांना तैनात करण्यात आलं. या घटनेनंतर पुष्पक एक्सप्रेसला एक तास थांबवून ठेवण्यात आलं. इतर गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे कोलमडलं आणि गाड्या ३० मिनिटं उशीराने धावत होत्या.
चांदनी स्थानकाची इमारत २००७ साली बांधण्यात आलीय. भुसावळचे डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानकाच्या इमारतीचा छप्पराचा भाग बडला आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. सर्व रेल्वे गाड्या सुरळीत सुरु असतील यासंदर्भातील नियोजन करण्यात आलं आहे. स्थानकाचं फार नुकसान झालं नसल्याचा दावा गुप्ता यांनी केलाय.