देशभर नव्या ट्रेननिर्मितीचे काम जोरात सुरू आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, प्रवासाचा आनंद घेता यावा याकरता आरामदायी ट्रेननिर्मिती केली जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशाच एका ट्रेनच्या डब्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कोणत्या ट्रेनचा असेल, असा प्रश्नही त्यांनी नेटीझन्सना विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ट्रेनच्या एका डब्याचा फोटो शेअर केला आहे. निर्मिती प्रक्रियेत असलेली ही ट्रेन कोणती? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसंच, “जॅक अॅण्ड जिल टेकडीवर गेला” अशी हिंटही त्यांनी दिली आहे. या फोटोवरून खरंतर अंदाज लावणं कठीण आहे. परंतु, आपल्या नेटिझन्सने अनेक अंदाज लावले आहेत. कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी (RCF) ने कालका-शिमला हेरिटेज ट्रॅकसाठी काचेचे छप्पर आणि मोठ्या खिडक्या असलेले चार विस्टाडोम नॅरोगेज डबे आणले आहेत. त्यानंतर आश्विनी वैष्णव यांनी हे ट्वीट केलं.

पर्यटनासाठी ही ट्रेन अत्यंत सोयीची असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. फोटोत असलेल्या ट्रेनमधील डब्याला मोठ्या प्रशस्त खिडक्या आहेत. दोन्ही बाजूंना सिंगल सिट्स आहेत. तसंच, खुर्च्यांसमोर एक टेबल आहे. नेटिझन्सनने दिलेल्या उत्तरानुसार ही ट्रेन टॉय ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. कालका-शिमला रुटसाठी या ट्रेनची निर्मिती झाली असल्याचंही नेटिझन्स म्हणत आहेत.

आरसीएफचे महाव्यवस्थापक आशेष अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सेवेत येण्यापूर्वी या डब्यांची कालका-शिमला मार्गावर चाचणी घेतली जाईल. ट्रेनमध्ये एक AC एक्झिक्युटिव्ह कार (१२ जागा), एक AC चेअर कार (२४ जागा), एक नॉन-AC चेअर कार (३० जागा) आणि पॉवर-कम-लगेज आणि गार्ड कार समाविष्ट असेल. ट्रायल रनसाठी ते कालका रेल्वेकडे सोपवण्यात आले आहेत. या ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्याकरात रेल्वे प्रशासनाकडून तारीख ठरवली जाणार आहे.

कालका-शिमला जोडणीसाठी ब्रिटिशांनी १९०३ साली पहिला रेल्वे मार्ग तयार केला होता. २००९ मध्ये या मार्गाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. या रेल्वे मार्गावर १०३ बोगदे, ८०० पूल आणि १८ रेल्वे स्थानके आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways minister asks to guess train in the making heres the hint sgk