आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्थानक परिसरातील मंदिराल रेल्वे प्रशासनानं नुकतीच एक नोटीस बजावली आहे. संबंधित रेल्वे स्थानक परिसरात नवीन लोहमार्ग बांधायचा असल्याने येथील चामुंडा देवीचं मंदिर स्थलांतरित करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून रेल्वेनं ही नोटीस बजावली होती. पण ही नोटीस आल्यानंतर हिंदुत्ववादी गटानं या आदेशाला विरोध केला आहे. संबंधित मंदिर जागेवरून हटवलं तर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या गटाने दिला आहे.
रेल्वे प्रशासनानं २० एप्रिल रोजी ही नोटीस बजावली होती. तसेच ३० एप्रिलपर्यंत संबंधित मंदिराचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं होते. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने केवळ मंदिरच नव्हे, तर भुरे शाह बाबा दर्गा आणि आग्रा छावणी रेल्वे स्थानकाच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदीला देखील अशीच नोटीस बजावली आहे. रेल्वेच्या या आदेशाला हिंदुत्ववादी गटाकडून विरोध केला आहे.
खरंतर, राजा की मंडी स्टेशन आग्रा शहराच्या मध्यभागी आहे. दिल्लीहून दक्षिणेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या या स्थानकावरून जातात. पण चामुंडा देवीच्या मंदिरामुळे रेल्वे रुळाला तीव्र वळण देण्यात आलं आहे. या तीव्र वळणामुळे याठिकाणी रेल्वेचा वेग कमी करावा लागतो. तसेच येथे अपघात होण्याची भीती कायम असते, असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. फलाट क्रमांक एकच्या दिशेला असलेल्या ७० मीटर जागेचा हा वाद आहे. याठिकाणी रेल्वेकडून नवीन लोहमार्ग निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे स्थानकाला आणखी जागेची आवश्यकता आहे.
२५० वर्षे जुने मंदिर
मंदिर हटवण्याच्या विरोधात जमलेल्या पुजारी आणि भक्तांच्या मते, हे मंदिर किमान २५० वर्षे जुनं आहे. इंग्रजांनी देखील या मंदिराला हात लावला नव्हता. चामुंडा देवी मंदिरात सेवा करणार्या मुख्य पुजार्यानं दावा केला की, ते लहानपणापासून या मंदिरात पूजा करतात. त्यांच्या पूर्वजांनी देखील याच मंदिरात सेवा दिली आहे. अनेक भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. प्रवासाला जाण्यापूर्वी प्रवासी देखील येथेच दर्शनाला येतात,” असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय हिंदू परिषद भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पराशर म्हणाले की, “ब्रिटीशकालीन मंदिर सध्याच्या जागेवरून हटवण्यास आमचा कठोर विरोध आहे. आम्ही असं होऊ देणार नाही. ब्रिटीशांनी देखील या मंदिराला हटवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यासाठी त्यांनी मंदिराच्या बाजूने वक्र आकाराचा लोहमार्ग तयार केला होता. या समस्येवर रेल्वे प्रशासनाने वेगळ्या पर्यायाचा विचार करावा. भारतीय रेल्वेकडून संबंधित निर्णय मागे न घेतल्यास आम्ही स्थानक परिसरात सामूहिक आत्मदहन करू,” असंही पराशर म्हणाले.