प्रवाशांना चांगल्या दर्जाचे अन्न पुरवण्याच्या उद्देशाने रेल्वेला ई-पँट्रीशी (भोजनयान) जोडण्यात येणार असून त्यामुळे प्रवासादरम्यान आपल्या पसंतीचे जेवण घेणे प्रवाशांना शक्य होईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी सांगितले.
प्रवाशांनी संकेतस्थळावर जेवणाची मागणी नोंदवल्यानंतर बेस किचनमार्फत काम करणाऱ्या कॅटर्स त्यांना हे जेवण पुरवतील. महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर हे बेस किचन उभारण्यात येतील, असे हरिद्वार रेल्वे स्थानकावरील नव्या इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर प्रभू यांनी सांगितले.
या नव्या पद्धतीमुळे प्रवाशांना रेल्वे प्रवासात केवळ ताजे आणि आरोग्यदायक अन्न मिळेल एवढेच नाही, तर त्या-त्या भागातील व्यापार व उद्योगाला चालना मिळेल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी महासंचालक अनिल काकोडकर यांना याचे तपशील तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असेही प्रभू यांनी सांगितले.
२९ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये खाद्यपेय व्यवस्थेची नवी पद्धत सुरू करण्यासाठी आम्ही राज्य सरकारांशी सहकार्य करणार आहोत. रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारांसोबत मिळून काम करण्याची योजना रेल्वेने आखली असल्याचेही प्रभू म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways to be linked to e pantry