ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक पातळीवर होणारे हवामान बदल आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा विपरीत परिणाम ही सध्या सर्वच देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती क्षेत्राला बसताना दिसत आहे. यासंदर्भात नुकताच APEC अर्थात एशियन-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरनं या वर्षीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असून त्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल असं सांगितलं जात आहे.

APEC नं एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे कसा व किती पाऊस पडेल? हवामान कसं राहील? यासंदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यामध्ये भारतासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या हवाल्याने द हिंदूनं दिलेल्या वृत्तामध्येही यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त होईल असं नमूद करण्यात आलं आहे.

अल निनो ते ला निना!

दरम्यान, APEC नं १५ मार्च २०२४ रोजी ENSO अर्थात अल निनो साऊदन्र ऑसायलेशन ही यंत्रणा वापरात आणली असून त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या काळात ला निनाचा मान्सूनवर प्रभाव दिसून येईल. मार्च ते मे २०२४ दरम्यान देशात अल निनोचा प्रभाव दिसून येईल. त्यानंतर मात्र जून ते सप्टेंबर या काळात ला निनाच्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होताना दिसू शकेल, अस अंदाजही APEC नं वर्तवला आहे.