वरुणराजाने आमच्या सरकारवर पूर्वीच्या सरकार इतकी कृपादृष्टी दाखवली नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर यंदा कमी राहिल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी मांडले. भारताच्या विकासातील अडथळे या विषयावर हाँककाँग येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ५५ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आधीच्या सरकारांवर वरुणराजा मेहरबान होता. मात्र, मोदी सरकारच्या प्रती वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली नाही. म्हणूनच मागील आर्थिक वर्षात आणि यंदा शेतीचा विकासदर नीचांकी राहिला, असे जेटली यांनी सांगितले. कृषी क्षेत्राची पिछाडी हे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील गंभीर आव्हान ठरत असून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही ते पुढे म्हणाले.
जून आणि जुलै महिन्यात पावसाला चांगली सुरूवात झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पुरती निराशा झाली. मान्सूनने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले. देशाचे जवळपास १५ टक्के इतके सकल राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी) हे शेतीवर अवलंबून आहे. लोकांनी आता उत्पादन आणि सेवा क्षेत्राकडील कल वाढवायला हवा, असेही जेटली यांनी यावेळी नमूद केले.