उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे मंगळवारी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाच्या बळींची संख्या ७३ झाली आहे. येथे विविध तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलेले सुमारे ७१ हजार ४४० यात्रेकरू पावसामुळे अडकून पडले आहेत, तर हिमाचल प्रदेशात हाच आकडा १७०० वर पोहोचला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असले तरीही बचावपथकांना पावसाच्या जोरामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या महापुरामुळे तसेच, सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांना गढूळ रंग प्राप्त झाला आहे.
रुद्रप्रयाग येथे अलकनंदा नदीचे रौद्ररूप
महापूर, दरडी कोसळणे आणि ढगफुटी यांमुळे एकटय़ा उत्तराखंड राज्यात ४४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १७५ घरे कोसळली आहेत. अलकनंदा नदीच्या प्रवाहाच्या तडाख्यात रुद्रप्रयाग येथे ७३ इमारती कोसळल्या, ज्यामध्ये ४० हॉटेलांचा समावेश आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आदी तीर्थक्षेत्री दर्शन घेण्यासाठी गेलेले ७१,४४० भाविक रुद्रप्रयाग, चामोली आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ात अडकून पडले आहेत.
महामार्ग बंद पडल्याने चारधाम यात्राही रद्द करण्यात आली आहे. चामोली येथे सर्वाधिक म्हणजे २७,०४०, रुद्रप्रयाग येथे २५ हजार आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ात ९८५० भाविक पावसामुळे अडकून पडले आहेत.
जलपातळी ओसरू लागली..
उत्तरकाशी येथील भागीरथी, हृषीकेश येथील गंगा नदी आणि अन्य नद्यांच्या जलपातळीत घट होऊ लागली असून अनेक ठिकाणी पूर ओसरू लागल्याची चिन्हे आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना पावसाचा फटका
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनाही पावसाचा तडाखा बसला. आदिवासी म्हणून गणल्या जाणाऱ्या किन्नूर जिल्ह्य़ात दरड कोसळल्यामुळे मुख्यमंत्री सुमारे ६० तास अडकून पडले. मंगळवारी पहाटे त्यांची सुटका करण्यात हेलिकॉप्टर पथकास यश आले. मात्र विविध ठिकाणी मिळून सुमारे १७०० जण अडकून पडले आहेत.
उत्तर प्रदेशातही धोक्याचा इशारा
गंगा, यमुना आणि शारदा नद्यांना अतिवृष्टीमुळे पूर येण्याची शक्यता असून राज्य सरकारतर्फे नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मुजफ्फरपूर येथे पावसाच्या जोरामुळे एक घर कोसळले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण जखमी झाले. महाराजगंज येथे तीन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव (सिंचन विभाग) दीपक सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी २४ तासांत उत्तराखंड आणि नेपाळ येथे ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान यमुनानगर आणि कर्नाल जिल्ह्य़ात पूरजन्य परिस्थिती असली, तरी पाऊस थांबल्यामुळे पाण्याची पातळी ओसरू लागली आहे.
यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली
पावसाने उत्तर भारतात घातलेल्या थैमानामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, परिसरातील लोकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणाने यमुनेच्या पात्रात १.५४ लाख क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे यमुनेच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. स्थलांतरितांना मदत करण्यासाठी २० छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
भाविकांसाठी पश्चिम बंगालतर्फे मदतकार्य
उत्तराखंड राज्यात पावसामुळे अडकलेल्या यात्रेकरूंची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याची तयारी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शविली आहे.

कैलास मानसरोवर यात्रा स्थगित
अतिवृष्टीमुळे कैलास मानसरोवर येथे यात्रेसाठी जाणाऱ्या दोन तुकडय़ा कुमाऊँ भागात थांबविण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीसाठीचा रस्ता सुरक्षित राहिला नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांतर्फे स्पष्ट करण्यात आले. पाऊस थांबला आणि रस्ते मोकळे झाले की नंतरच यात्रेकरूंना पुढे पाठविण्यात येईल.

हवामान बदलांमुळे भारतीय उपखंडातील चौदा हजार चौरस कि.मी. जमीन पाण्याखाली?
हवामान बदलामुळे सागरी पाण्याची पातळी वाढून भारतीय उपखंडातील चौदा हजार चौरस किलोमीटर जमीन पाण्याखाली जाईल असा धोक्याचा इशारा एका अभ्यास अहवालात देण्यात आला आहे. ‘जर्नल ऑफ थ्रेटनड टॅक्सा’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, सागराचे पाणी किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये घुसून मोठा भूभाग पाण्याखाली जाईल. जर सागरी पातळी १ मीटरने वाढली तर १३,९७३ चौरस कि.मी. भाग पाण्याखाली जाईल तर सागरी पातळी ६ मीटरने वाढली, तर  ६०,४९७ चौरस कि.मी. भाग पाण्याखाली जाईल.
पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. एम. झफर उल इस्लाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की, सागरी जलपातळी ही महासागरांचा विस्तार, पर्वतीय हिमनद्यांचे वितळणे व बर्फाचे थर वितळणे यामुळे होत आहे, जो जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. सागरी जलपातळी सहा मीटरने वाढली तर किनारपट्टीलगतचा फार मोठा भाग पाण्याखाली जाणार आहे, त्यामुळे भारतातील ४८ पर्यावरण विभागांपैकी १८ विभागांना थेट फटका बसणार आहे. सागरी जलपातळी १ मीटर वाढली तर १९ ते ५९ टक्के भाग पाण्याखाली जाईल तर सागरी जलपातळी ६ मीटर वाढली तर २७ ते ५८ टक्के भाग पाण्याखाली जाईल. सागरी पातळी २ मीटरने वाढली तर गोदावरी-कृष्णा विभागात एक चतुर्थाश भाग पाण्याखाली जाईल तर पश्चिम बंगालमधील सुंदरबनचा निम्मा भाग पाण्याखाली जाईल. सागरी पाण्याची पातळी ६ मीटरने वाढली तर सुंदरबन, कच्छचे रण यांचा निम्म्याहून अधिक भाग पाण्याखाली जाईल. भितरकणिका, चिल्का सरोवर, पॉइंट कालीमीरी, इंटरव्ह्य़ू आयलंड, लोथियन आयलंड, सजनाखाली, पुलिकत लेक हे सगळे भाग जलपातळी १ मीटर वाढल्यास ५० टक्के पाण्याखाली जातील. जलपातळी सहा मीटर वाढली तर कच्छचे रण, वेलावदार, पुलिकत व नल सरोवर हे भाग पाण्याखाली जातील. त्यामुळे किनारी भागात वाढणाऱ्या प्राणी, वनस्पती यांच्या अनेक दुर्मीळ जाती नष्ट होऊन जैवविविधता धोक्यात येणार आहे.

Story img Loader