उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे मंगळवारी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाच्या बळींची संख्या ७३ झाली आहे. येथे विविध तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलेले सुमारे ७१ हजार ४४० यात्रेकरू पावसामुळे अडकून पडले आहेत, तर हिमाचल प्रदेशात हाच आकडा १७०० वर पोहोचला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असले तरीही बचावपथकांना पावसाच्या जोरामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या महापुरामुळे तसेच, सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांना गढूळ रंग प्राप्त झाला आहे.
रुद्रप्रयाग येथे अलकनंदा नदीचे रौद्ररूप
महापूर, दरडी कोसळणे आणि ढगफुटी यांमुळे एकटय़ा उत्तराखंड राज्यात ४४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १७५ घरे कोसळली आहेत. अलकनंदा नदीच्या प्रवाहाच्या तडाख्यात रुद्रप्रयाग येथे ७३ इमारती कोसळल्या, ज्यामध्ये ४० हॉटेलांचा समावेश आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आदी तीर्थक्षेत्री दर्शन घेण्यासाठी गेलेले ७१,४४० भाविक रुद्रप्रयाग, चामोली आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ात अडकून पडले आहेत.
महामार्ग बंद पडल्याने चारधाम यात्राही रद्द करण्यात आली आहे. चामोली येथे सर्वाधिक म्हणजे २७,०४०, रुद्रप्रयाग येथे २५ हजार आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ात ९८५० भाविक पावसामुळे अडकून पडले आहेत.
जलपातळी ओसरू लागली..
उत्तरकाशी येथील भागीरथी, हृषीकेश येथील गंगा नदी आणि अन्य नद्यांच्या जलपातळीत घट होऊ लागली असून अनेक ठिकाणी पूर ओसरू लागल्याची चिन्हे आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना पावसाचा फटका
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनाही पावसाचा तडाखा बसला. आदिवासी म्हणून गणल्या जाणाऱ्या किन्नूर जिल्ह्य़ात दरड कोसळल्यामुळे मुख्यमंत्री सुमारे ६० तास अडकून पडले. मंगळवारी पहाटे त्यांची सुटका करण्यात हेलिकॉप्टर पथकास यश आले. मात्र विविध ठिकाणी मिळून सुमारे १७०० जण अडकून पडले आहेत.
उत्तर प्रदेशातही धोक्याचा इशारा
गंगा, यमुना आणि शारदा नद्यांना अतिवृष्टीमुळे पूर येण्याची शक्यता असून राज्य सरकारतर्फे नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मुजफ्फरपूर येथे पावसाच्या जोरामुळे एक घर कोसळले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण जखमी झाले. महाराजगंज येथे तीन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव (सिंचन विभाग) दीपक सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी २४ तासांत उत्तराखंड आणि नेपाळ येथे ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान यमुनानगर आणि कर्नाल जिल्ह्य़ात पूरजन्य परिस्थिती असली, तरी पाऊस थांबल्यामुळे पाण्याची पातळी ओसरू लागली आहे.
यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली
पावसाने उत्तर भारतात घातलेल्या थैमानामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, परिसरातील लोकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणाने यमुनेच्या पात्रात १.५४ लाख क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे यमुनेच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. स्थलांतरितांना मदत करण्यासाठी २० छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
भाविकांसाठी पश्चिम बंगालतर्फे मदतकार्य
उत्तराखंड राज्यात पावसामुळे अडकलेल्या यात्रेकरूंची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याची तयारी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शविली आहे.
उत्तर भारतात पावसाचे थैमान
उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे मंगळवारी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाच्या बळींची संख्या ७३ झाली आहे. येथे विविध तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलेले सुमारे ७१ हजार ४४० यात्रेकरू पावसामुळे अडकून पडले आहेत, तर हिमाचल प्रदेशात हाच आकडा १७०० वर पोहोचला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असले तरीही बचावपथकांना पावसाच्या जोरामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2013 at 01:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain hit north india badlykilled