राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा हे आयपीएलमध्ये सट्टेबाजी करीत होते. स्वतः कुंद्रा यांनीच पोलिसांपुढे याची कबुली दिल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. राज कुंद्रा यांची बुधवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तब्बल १२ तास कसून चौकशी केली. याच चौकशीवेळी राज कुंद्रा यांनी सट्टेबाजी करीत असल्याचा जबाब दिला.
राजस्थान रॉयल्स संघावरच आपण सट्टेबाजी करीत होतो आणि यामध्ये आपले मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, राज कुंद्रा यांचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला असून, त्यांना चौकशीसाठी पुन्हा दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेत बोलावले जाण्याची शक्यता आहे.
स्पॉट फिक्सिंगवरून दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अगोदरच अटक केली आहे. आयपीएलमध्ये राज कुंद्रा यांनी कशा पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केली आणि अटक करण्यात आलेल्या तिन्ही खेळाडूंची वर्तणूक कशी होती, हे जाणून घेण्यासाठी राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने सांगितले होते. बुधवारी सकाळी नऊ वाजता राज कुंद्रा लोधी कॉलनीतील दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागात आले होते. रात्री सव्वा नऊच्या सुमारास ते तिथून बाहेर पडले.

Story img Loader