महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड मध्ये होणार आहे. काल पुण्यामध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टिका केली. भाजपा सरकारच्या काळात देशात काहीच काम झाले नाही अशी टिका त्यांनी या वेळी केली. मात्र सभेमध्ये भाषणाचा सुरुवात करताना राज यांनी मनसेचे दिवंगत नेते, खडकवासला मतदारसंघाचे पक्षाचे आमदार आणि ‘गोल्डमॅन’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या रमेश वांजळे यांची आठवण काढली.
उपस्थितांना अभिवादन केल्यानंतर राज यांनी वांजळे आज हवे होते असे म्हणत त्यांची आठवण काढली. ‘खडकवासला भागातून येताना जाताना माझ्या रमेश वांजळेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते,’ असं राज ठाकरे म्हणाले.
खडकवासला भागातून येताना जाताना माझ्या रमेश वांजळेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते. #RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 18, 2019
कोण होते वांजळे
खडकवासला मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आणि ‘गोल्डमॅन’ अशी सर्वदूर ओळख असलेले रमेश वांजळे यांचे १० जून २०११ रोजी जहांगीर रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४६ वर्षी निधन झाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व अन्य नेते वांजळे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते.
वांजळे यांनी राजकारणात प्रवेश केला ते आहिरे गावाचे सरपंच या नात्याने. त्यानंतर ते पंचायत समितीचे उपसभापती झाले. त्यांच्या पत्नी हर्षदा या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत वांजळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यात ते प्रचंड मतांनी विजयी झाले. अंगावर मोठय़ा प्रमाणावर सोन्याचे दागिने घालत असल्याने त्यांना ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अंगावरील दागिने किलोमध्येच मोजण्यात येत असतं. या दागिन्यांची राज्यभर चर्चा झाली आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दागिने घालू नये, अशी सूचनाही त्यांना केली होती. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनातील शपथ ग्रहण कार्यक्रमात त्यांनी आबू आझमी यांच्या समोरील ध्वनिवर्धक खेचत गोंधळ घातला होता. आझमी यांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यामुळे त्यांच्यासह काही आमदारांना निलंबितही करण्यात आले होते. काँग्रेसचे दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांना गुरुस्थानी मानून ते राजकारणात आले होते. अल्पावधीतच राज्यभर त्यांनी लोकप्रियता मिळविली होती.