Nirmala Sitharaman Speech In Rajya Sabha: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आज नवीन प्राप्तीकर विधेयक सादर केले. यानंतर आता नवीन प्राप्तीकर विधेयक सहा दशके जुन्या आयकर कायद्याची जागा घेईल. हे विधेयक १ एप्रिल २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. नवीन विधेयकात कोणतेही मोठे संरचनात्मक बदल झालेले नसून, यामध्ये स्पष्ट भाषा, अतिरिक्त तरतुदी आणि स्पष्टीकरणे काढून टाकणे आणि उत्पन्नाची विस्तारित व्याख्या यांचा समावेश आहे. नवीन प्राप्तीकर विधेयकात, करदात्याच्या भांडवली मालमत्ता म्हणून गणल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या व्याख्येत व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान लोकसभेत हे विधेयक सादर केल्यानंत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. तेव्हा पी. चिदंबरम सभागृहात नसूनही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. यावेळी राज्यसभेचे हंगामी सभापती घनश्याम तिवारी यांनी अर्थमंत्र्यांचे कौतुक केले. कारण, जेव्हा प्रश्न विचारणारा सदस्य सभागृहात नसतो, तेव्हा मंत्र्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक नसते.
राज्यसभेत नेमकं काय घडलं?
यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या, “सर, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या सर्व शंकांची उत्तरे माझ्याकडे आहेत. त्यांनी पत्राद्वारे, ते आज सभागृहात उपस्थित नसतील याची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत माहिती दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.”
यानंतर हंगामी सभापतींनी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना थांबवत, “हा आपली उदारपणा आहे की, संसदीय परंपरेनुसार एखादा सदस्य सभागृहात बोलून निघून जातो तेव्हा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे बंधनकारक नसते. पण, आपण उदारपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहात.”
गंभीर आव्हाने
पुढे बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, “हा अर्थसंकल्प अतिशय कठीण काळात तयार करण्यात आला आहे. विशेषतः, यासाठी बाहेरची आव्हाने खूप गंभीर आहेत. गेल्या अनेक दशकांपासून आपण जागतिकीकरणाबद्दल बोलत आहोत. आता आपण जगात विखंडनाच्या समस्येचा सामना करत आहोत. प्रत्येकाला मुक्त बाजारपेठ हवी आहे पण यामध्ये वाढत्या आयात शुल्कासारखे मोठे अडथळे आहेत. जग एका मोठ्या बदलातून पुढे जात आहे.”