श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे हे ७० सदस्यीय शिष्टमंडळासह शुक्रवारपासून बोधीगया आणि तिरुपती तीर्थाटणाच्या हेतूने भारताच्या खासगी भेटीवर आले असून पाटण्यातील बोधगया येथील महाबोधी मंदिरापासून त्यांची यात्रा सुरू झाली आहे. त्यांच्या या दौऱ्याने तामिळनाडूत तणाव निर्माण झाला असून द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राजपक्षे यांचे गया आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी त्यांचे स्वागत केले. बिहारचे शिक्षणमंत्री पी. के. शाही आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी विमानतळावर उपस्थित होते. राज्य पोलिसांच्यावतीने राजपक्षे यांना मानवंदना देण्यात आली. विमानतळावरून राजपक्षे हे आपल्या ताफ्यासह थेट मंदिरात गेले असून तेथे ते अनेक धार्मिक विधी पार पाडणार आहेत. भगवान बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली आत्मज्ञान लाभले त्या वृक्षालगत ते ध्यानधारणा करणार आहेत तसेच गावातील श्रीलंकेच्या बौद्धविहारालाही भेट देणार आहेत. राजपक्षे व त्यांच्यासह आलेल्या भाविकांसाठी मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी शाही मेजवानीही आयोजिली आहे.
राजपक्षे यांच्या या दौऱ्याविरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत. बोधगया येथे त्यांचा ताफा मंदिराकडे जात असताना वाटेत मार्क्‍स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. बघ्यांच्या गर्दीत मिसळलेल्या या कार्यकर्त्यांनी हा ताफा जात असतानाच ‘तामिळींच्या मारेकऱ्यांनो चालते व्हा’, अशा घोषणा सुरू केल्याने काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. दोन निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजपक्षे यांच्या या दौऱ्यानिमित्त बिहारमध्ये कडेकोट बंदोबस्त आहे.
तामिळनाडूत करुणानिधी यांनी राजपक्षे यांच्या विरोधात राज्यव्यापी निदर्शने केली. करुणानिधी यांनी अलीकडेच तामिळ ईलम समर्थक संस्थेला पुनरूज्जीवित केले आहे. त्यांच्याच वतीने राज्यभर शुक्रवारी आंदोलने झाली. काळे कपडे घालून हजारो निदर्शकांनी राजपक्षे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. राजपक्षे हे श्रीलंकेतून तामिळ माणसांनाच नव्हे तर तामिळ भाषेला आणि संस्कृतीलाही हद्दपार करू पाहात आहेत, असा आरोपही करुणानिधी यांनी केला. राजपक्षे यांच्या प्रतिमेचे राज्यात अनेक भागांत दहन केले गेले तर काही शहरांत वकिलांच्या बहिष्कारामुळे न्यायालयांचे कामकाज थंडावले होते.
तिरुपतीतही कडेकोट बंदोबस्त
राजपक्षे यांच्या दौऱ्यात तामिळनाडूत काही संघटना घातपात घडविण्याची शक्यता असल्याची माहिती हाती आल्याने तिरुपतीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विमानतळापासून अलिपिरीच्या पायथ्यापर्यंत असलेला १५ किलोमीटरचा मार्ग आणि विमानतळापासून तिरुमलापर्यंतच्या १८ किलोमीटरच्या मार्गावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.