पीटीआय, कोलंबो : श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांना त्यांच्या सरकारी निवासस्थानातून हलवण्यात आल्यानंतर त्रिंकोमाली येथील नौदल तळात संरक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे देशाचे संरक्षण सचिव कमल गुणरत्ने यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याच्या मुद्दय़ावर देशात निदर्शने सुरू असताना, ‘दिसताच गोळय़ा घाला ’ असा आदेश मिळालेल्या सशस्त्र वाहनांतील सुरक्षा दलांनी देशभरातील रस्त्यांवर गस्त घातली.

महिंदू राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार उसळल्यामुळे; २००५ ते २०१५ दरम्यान अध्यपदाच्या कारकीर्दीत लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) विरुद्ध अमानुष लष्करी मोहिमेसाठी ओळखले जाणारे श्रीलंका पीपल्स पार्टीचे (एसएलपीपी) नेते महिंदू यांनी सोमवारी राजीनामा दिला. या हल्ल्यानंतर राजपक्ष समर्थक राजकीय नेत्यांविरुद्ध उफाळलेल्या व्यापक हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ जण ठार झाले.

 तीनवेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले महिंदू राजपक्षे यांचे निवासस्थान सोमवारी पेटवून देण्यात आले. आपल्या समर्थकांवर भीषण हल्ले करण्यात आल्यानंतर महिंदू हे त्यांची पत्नी व कुटुंबीयांसह टेंपल ट्रीज या त्यांच्या सरकारी निवासस्थानातून पळून गेले आणि त्यांनी त्रिंकोमालीतील नौदल तळावर आश्रय घेतला. त्रिंकोमाली हे देशाच्या ईशान्य किनाऱ्यावरील बंदराचे शहर आहे.

‘महिंदू राजपक्षे यांना त्रिंकोमालीतील नौदल तळावर हलवण्यात आले आहे’, असे कमल गुणरत्ने यांनी पत्रकारांना सांगितले. ‘ते कायमचे तेथे राहणार नाहीत. परिस्थिती सामान्य झाली की त्यांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी हलवण्यात येईल’, असे ते म्हणाले.  महिंदू हे त्रिंकोमालीच्या नौदल तळावर असल्याचे वृत्त पसरल्यानंतर लोकांनी या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणी निदर्शने सुरू केली. महिंदू तसेच त्यांचे मोठे भाऊ व अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततेने निदर्शने करणाऱ्या सरकारविरोधी निदर्शकांविरुद्ध हिंसाचार केल्याबद्दल महिंदू यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी राजकीय पक्ष करत आहेत.

लष्कराची कोलंबोत गस्त

सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सैनिकांनी बुधवारी लष्करी वाहनांतून कोलंबोच्या रस्त्यांवर गस्त घातली. सार्वजनिक मालमत्तेची लूटपाट करणाऱ्या किंवा इतरांना हानी पोहचवणाऱ्या कुणावरही गोळय़ा झाडण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने आदल्या दिवशी लष्कर, हवाई दल व नौदल यांना दिला होता. लष्करी विशेष दलांचे ‘कॉम्बॅट रायडर्स’ कोलंबो व उपनगरांमध्ये फिरत्या गस्तीसाठी तैनात करण्यात आले आहे.

गोताबया यांची चर्चा

राजकीय तिढा संपवण्यासाठी आणि पदच्युत पंतप्रधान महिंदू यांचा वारसदार नेमण्यासाठी अध्यक्ष गोताबया हे सत्ताधारी पक्षातील बंडखोर आणि एसजेबी या मुख्य विरोधी पक्षाशी चर्चा करणार आहेत.