एका औषध कंपनीकडे दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजमेरच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक दिव्या मित्तल यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. दिव्या मित्तल यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दिव्या यांच्या अटकेनंतर पोलिसांनी उदयपूर येथील त्यांच्या फार्म हाऊस आणि रिसॉर्टवर छापा टाकला. या छाप्यात महागडे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. हे मद्य ‘खास’ पाहुण्यांना दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे रिसॉर्ट दिव्या मित्तल यांचा सहकारी आणि निलंबित पोलिस कर्मचारी सुमित कुमार चालवत होता. सुमित कुमार देखील लाच घेतल्याप्रकरणी निलंबित आहे. आता दोघांविरोधात पोलिसांनी अबकारी अधिनियमांच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टवर मद्य सुविधा देण्याचा कोणताही परवाना दिलेला नव्हता. तरिही बेकायदेशीररित्या इथे मद्य पुरविले जात होते. राजस्थानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टवर अनेक राजकारणी आणि काही खास पाहुणे येत होते. अटक झाल्यानंतर दिव्या मित्तल यांनी सांगितले होते की, वरपर्यंत पैसे पोहोचते करावे लागतात. आता वरपर्यंत म्हणजे नेमके कुठे? यात काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील समावेश आहे का? अशीही अटकळ बांधण्यात येत आहे.

याच रिसॉर्टवर औषध कंपनीच्या एका प्रतिनिधीला बोलावून धमकी देण्यात आली होती. दिव्या मित्तल यांच्यासाठी सुमित कुमारने संबंधित कंपनीकडे दोन कोटींची मागणी केली होती. तसेच २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता अजमेर येथे देण्याचेही ठरले होते. मात्र औषध कंपनीच्या प्रतिनिधींने एसीबीकडे याची तक्रार केल्यानंतर दिव्या मित्तल यांचा लाचखोरीचा प्रकार समोर आला. राजस्थान एसीबीकडून दिव्या मित्तल यांची कसून चौकशी सुरु आहे. एसीबीने अजमेर, उदयपूर, झुंझुनू आणि जयपूर येथील पाच ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली असून आणखी मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.

कोण आहेत दिव्या मित्तल

दिव्या मित्तल या अजमेर येथे स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक या पदावर कार्यरत होत्या. त्या मूळ हरियाणा राज्यातील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब राजस्थानच्या झुंझुनू या जिल्ह्यातील चिडावा याठिकाणी स्थलांतरीत झाले होते. दिव्या मित्तल २००७ साली आरएएस परिक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर त्या राजस्थान पोलिस सेवेत रुजू झाल्या. पोलिस सेवेत रुजू होण्याआधी कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केले होते. पोलिस सेवेत रुजू झाल्यामुळे जिल्ह्यात त्यांचे खूप कौतुक करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्या मित्तल यांनी आरोप फेटाळले

दिव्या मित्तल यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याकडे असलेली संपत्ती ही ड्रग्स माफियांना पकडल्यानंतर बक्षिसाच्या स्वरुपात मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मला फसविण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले असून अजमेर मधील अनेक पोलिस अधिकारी ड्रग्सच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.